Kolhapur- Kalamba Gas Explosion: गॅसलाइनची 'एंडकॅप'; भोजणे कुटुंबाचा 'एंड'

By उद्धव गोडसे | Updated: September 12, 2025 19:50 IST2025-09-12T19:49:54+5:302025-09-12T19:50:13+5:30

कंपनी कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा, कार्यपद्धतीवर प्रश्न

Three members of the Bhojne family of Kalamba Kolhapur lost their lives due to the carelessness of the worker connecting the gas pipeline | Kolhapur- Kalamba Gas Explosion: गॅसलाइनची 'एंडकॅप'; भोजणे कुटुंबाचा 'एंड'

Kolhapur- Kalamba Gas Explosion: गॅसलाइनची 'एंडकॅप'; भोजणे कुटुंबाचा 'एंड'

उद्धव गोडसे

कोल्हापूर : पाइपलाइनने घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. अत्यंत जोखमीचे काम प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर सोपवून त्या कामाची वेळोवेळी खातरजमा करण्याची जबाबदारी एचपी ऑईल गॅस आणि त्यांच्या ठेकेदार कंपन्यांची होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आणि पाइपलाइन जोडणाऱ्या कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा कळंब्यातील भोजणे कुटुंबीयांच्या जीवावर बेतला. या घटनेमुळे कंपनीची कार्यपद्धती आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड व ऑईल इंडिया लिमिटेड या कंपनीकडून कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील घरांमध्ये पाइपलाइनने गॅस पुरवठा करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. शहरात जमिनीखालून गॅस पाइपलाइन टाकणे, मीटर आणि रेग्युलेटर जोडून देण्याचे काम कंपनीने पुण्यातील सीतामाता कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले आहे. तर या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी इडिप्लस इंजिनीअरिंग ग्लोबल प्रा. लि. कंपनीला दिली आहे.

२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सीतामाता कन्स्ट्रक्शनचा कर्मचारी महंमदहुजेर हुजेरअली याने अमर भोजणे यांच्या घरात गॅस पाइपलाइनची जोडणी केली. मीटर जोडण्यापूर्वी पाइपलाइनला एन्डकॅप जोडली जाते. एन्डकॅप न जोडताच तो निघून गेला आणि मुख्य गॅस वाहिनीतून पुरवठा सुरू केला. हीच चूक दुर्घटनेला कारणीभूत ठरली. या एका चुकीने तिघांचा जीव गेला.

गंध नसल्याने समजलेच नाही

पाइपलाइनद्वारे येणाऱ्या गॅसला गंध नाही. त्यामुळे त्याची गळती झाल्याचे समजत नाही. भोजणे यांच्या घरात असेच घडले. वास येत नसल्याने गळती सुरू असल्याचे समजलेच नाही. यातच पावसामुळे घराच्या खिडक्या आणि मुख्य दरवाजा बंद असल्याने तिन्ही खोल्यांमध्ये गॅस साठला. रात्री घरातील लाइट बंद करताना अचानक प्रचंड स्फोट होऊन शीतल भोजणे, त्यांचे सासरे अनंत भोजणे, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका हे चौघे गंभीर जखमी झाले.

कनेक्शन घेण्यास टाळाटाळ

दुर्घटनेनंतर कंपनीची कार्यपद्धती आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कळंब्यातील मनोरमा कॉलनीत बहुतांश रहिवाशांनी कनेक्शन नाकारले आहे. काही कुटुंबांनी जोडणी केलेले साहित्य काढून घेण्यास कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

गावाकडे जाण्याच्या घाईने जोडणी

गणेशोत्सवासाठी कोकणातील देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या मूळ गावी जाण्याचे नियोजन भोजणे कुटुंबीयांनी केले होते. पुन्हा घर बंद असल्याने जोडणी राहून जाईल, या विचारातून त्यांनी २५ ऑगस्टला जोडणी केली. त्यानंतर अवघ्या चार तासांतच दुर्घटना घडली.

Web Title: Three members of the Bhojne family of Kalamba Kolhapur lost their lives due to the carelessness of the worker connecting the gas pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.