कोल्हापूर : फॉरेक्स ट्रेडिंगमधून गुंतवणुकीवर दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सुमारे २६ लाखांची फसवणूक झालेल्या एका गुंतवणूकदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी तिघांवर सोमवारी (दि. २०) गुन्हा दाखल केला. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांचा मुलगा दीपक सर्जेराव पाटील (रा. कळे, ता. पन्हाळा) याच्यासह युवराज सदाशिव पाटील (रा. कोलोली, ता. पन्हाळा) आणि अविनाश मारुती राठोड (सध्या रा. शाहूपुरी, मूळ रा. परभणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक पाटील आणि युवराज पाटील यांनी फॉरेक्स ट्रेडिंगमधून दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२२ मध्ये फिर्यादींनी या दोघांकडे ३० लाखांची गुंतवणूक केली. नागाळा पार्क येथील पर्ल टीएम ग्रुपच्या कार्यालयात संशयितांनी पैसे स्वीकारले. सुरुवातीचे दोन महिने काहीच परतावा दिला नाही.पैसे परत मागितल्यानंतर त्यांनी दोन महिन्यांच्या परताव्यापोटी ४ लाख १० हजार रुपये किमतीचा उचगाव येथील एक प्लॉट फिर्यादींच्या नावे केला. त्यानंतर मुद्दल आणि परतावा दिला नाही. वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नसल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिन्ही संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.व्याप्ती वाढणारजिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांचा मुलगा दीपक पाटील हा कळे-खेरीवडे गावचा सदस्य आहे. त्याने मित्रांसोबत कोल्हापुरात ट्रेडिंग कंपनी सुरू केली. गोड बोलून अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांच्याकडे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘लोकमत’ने या फसवणुकीसंदर्भातील वृत्त सर्वप्रथम १९ मार्च २०२४ ला दिले होते.
फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक; कोल्हापुरात तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:24 IST