कथित घोटाळा झालेल्या काळात संचालकच नव्हतो : हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 18:08 IST2019-08-22T18:04:47+5:302019-08-22T18:08:03+5:30
: ज्या काळात राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याची तक्रार आहे, त्या काळात या बँकेचा मी संचालकच नव्हतो, तेव्हा मी त्यात आरोपी असण्याचा प्रश्र्नच येत नाही असे स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

कथित घोटाळा झालेल्या काळात संचालकच नव्हतो : हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : ज्या काळात राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याची तक्रार आहे, त्या काळात या बँकेचा मी संचालकच नव्हतो, तेव्हा मी त्यात आरोपी असण्याचा प्रश्र्नच येत नाही असे स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
उच्च न्यायालयाने त्यांच्यासह पक्षाचे नेते अजित पवार व एकूण ७७ आजी-माजी संचालकांवर २०११ मध्ये झालेल्या सुमारे २५ हजार कोटींच्या घोटाळ््याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गुरुवारी दुपारी दिले. त्यानंतर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले,‘न्यायालयाने दिलेल्या मुळ आदेशाची प्रत तपासून पहावी. त्यामध्ये माझे कुठेच नाव नाही. असे असतानाही माझे नांव या घोटाळ््यात गोवण्याचा खोडसाळपणा मुद्दाम केला असल्याची टीका त्यांनी केली.
मला भाजपकडून पक्षात येण्याची आॅफर होती. परंतू आम्ही शरद पवार एके शरद पवार अशी भूमिका घेवून भाजपचा प्रस्ताव धडकावून लावला. त्यामुळेही असा खोडसाळपणा केला जात असल्याची टिप्पण्णी त्यांनी केली.
मुश्रीफ यांचे कागलमधील घर, साखर कारखान्याचे कार्यालय व मुंबई-कोल्हापूरातील नातेवाईकांच्या घरांवर गेल्या पंधरवड्यात प्राप्तीकर विभागाने छापे टाकल्याने त्यावेळीही ते चर्चेत आले होते.