कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही प्रसूती नाही; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काय स्थिती.. वाचा
By समीर देशपांडे | Updated: October 8, 2025 13:16 IST2025-10-08T13:14:22+5:302025-10-08T13:16:24+5:30
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार आरोग्य स्थिती तपासण्यात आली

कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही प्रसूती नाही; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काय स्थिती.. वाचा
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आरोग्य स्थितीची गावपातळीवर नेमकी काय स्थिती आहे, याचे चित्र स्पष्ट होणे महत्त्वाचे असल्याने सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार आरोग्य स्थिती तपासण्यात आली. आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्या सादरीकरणातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्याचा वेध घेणारी विशेष मालिका आजपासून..
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोल्हापूर विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८४ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही प्रसूती झाली नसल्याचे चित्र समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६८ पैकी ५१ केंद्रांमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यातील ८२ पैकी ३१ आणि सांगली जिल्ह्यातील ७० पैकी १८ केंद्रांमध्ये पाच महिन्यांत सरासरी एकही प्रसूती झालेली नाही.
‘सार्वजनिक आरोग्य’च्या कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती व्हावी, यासाठी गेली अनेक वर्षे केंद्र आणि महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. परंतु, ही संख्या फारशी वाढत नसल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक महिन्याला प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान १० प्रसूती व्हाव्यात, अशी शासनाची अपेक्षा आहे.
ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पूर्ण क्षमतेने काम करतात आणि ज्यांचा जनतेशी अतिशय चांगला संपर्क आहे, अशा ठिकाणी यापेक्षाही अधिक प्रसूती होत आहेत. परंतु, अनेक ठिकाणी कारणे जरी वेगवेगळी असली, तरीही त्या ठिकाणी इतक्या मूलभूत सुविधा देवूनही प्रसूती होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या पाच महिन्यांतील ही सरासरी आकडेवारी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे आणि हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वाधिक प्रसुती झाल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर आणि संख प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चंदराई आणि धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वाधिक प्रसूती झाल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वाधिक प्रसूती झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हे प्रमाण खूपच कमी आहे.
चार जिल्ह्यांतील शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थेतील प्रसूतीची टक्केवारी
जिल्हा - शासकीय रुग्णालये - खासगी रुग्णालये
- कोल्हापूर - ३९ - ७१
- सांगली - ३८ - ६२
- रत्नागिरी - ३८ - ६२
- सिंधुदुर्ग - ५७ - ४३