Vidhan Sabha 2024: कोल्हापूर जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत वाद नाही - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 16:33 IST2024-09-25T16:33:01+5:302024-09-25T16:33:40+5:30
भाजप नेतृत्वावरचा केंद्राचा विश्वास उडाला

Vidhan Sabha 2024: कोल्हापूर जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत वाद नाही - सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापुरातील दहाही विधानसभा जागांवर महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उद्धवसेना, आम्ही सर्व जण जागा मागत असलो तरी सामोपचाराने चर्चा करून जागांचे वाटप होईल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आमदार पाटील म्हणाले, राज्यात दीडशेहून अधिक जागांचे वाटप झाले आहे. आणखी काही आहेत ते ३० आणि १ ऑक्टोबरला स्पष्ट होईल. महायुती म्हणून ते सर्व जण एकत्र लढले तरी राज्यातील जनतेनेच त्यांना घरी बसवायचा निर्णय घेतला आहे, या शब्दांत त्यांनी महायुतीलाही डिवचले.
पाटील म्हणाले, बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती. मात्र, मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळे बोलत आहेत, हे संयुक्तिक नाही. आपटे ना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का, याची शंका आहे. आरोपीने पोलिसांवर गोळीबार करणे, हे गृह खात्याची नामुश्की आहे.
भाजप नेतृत्वावरचा केंद्राचा विश्वास उडाला
राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर केंद्राचा विश्वास उडालेला आहे. राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाची क्षमता संपलेली आहे. भाजप एकसंध ठेवू शकत नाही, हे दिल्लीच्या नेतृत्वाला कळलेले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे वारंवार दौरे करावे लागत आहेत, असा चिमटाही आमदार पाटील यांनी काढला.