आत्मविश्वास नसल्यानेच भाजपकडून फोडाफोडी, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे टीकास्त्र
By पोपट केशव पवार | Updated: December 23, 2023 18:20 IST2023-12-23T18:20:07+5:302023-12-23T18:20:53+5:30
'आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल'

आत्मविश्वास नसल्यानेच भाजपकडून फोडाफोडी, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे टीकास्त्र
कोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयाचा आत्मविश्वास नाही. त्यामुळेच ते राष्ट्रवादी, शिवसेना पक्षात फोडाफोडी करत आहेत. मात्र, त्यांनी कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल, असा विश्वास माजी मंत्री, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.
काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त २८ डिसेंबरला नागपूर येथे महारॅलीचे आयोजन केले असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तीन हजार कार्यकर्ते जाणार आहेत. त्याच्या तयारीसाठी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आ.पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तीन राज्यातील निवडणुकीतील यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे का? या प्रश्नावर आ.पाटील यांनी आत्मविश्वास वाढला असेल तर मग राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष फोडायची गरज का भासते? असा सवाल केला. त्यांच्याकडे बहुमत असतानाही फोडाफोडी केली. याचा अर्थ, येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना विजयाचा विश्वास नसल्याने ते फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, बैठकीत आ.पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी आमदार पी.एन.पाटील, आ.जयश्री जाधव, आ.राजू आवळे, आ.जयंत आसगावकर, गोपाळराव पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, संजय पोवार-वाईकर, बाजीराव खाडे, भारती पवार,तौफिक मुलानी, सूर्यकांत पाटील-बुध्याळकर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
दिल्लीतच ठरेल लोकसभेची जागा
राज्यातील लोकसभेच्या जागांसंदर्भात २९, ३० डिसेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे. कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघापैकी एक जागा काँग्रेसकडे घेण्यासंदर्भातील निर्णय तिथे होऊ शकतो, असे आ.पाटील यांनी सांगितले.
आम्ही एकसंध, मतभेद नाहीत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी पक्षात नाराजी नाही. आम्ही सर्व एकसंध असून एकीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगत आ.पाटील यांनी पटोले यांच्याविषयी पक्षात नाराजी असलेल्या चर्चां निरर्थक असल्याचे सांगितले.