Kolhapur- Mushrif-Ghatge alliance: चेहऱ्यावरचा ताणतणाव... न खोललेले पत्तेच जास्त
By समीर देशपांडे | Updated: November 19, 2025 17:16 IST2025-11-19T17:13:39+5:302025-11-19T17:16:02+5:30
Local Body Election: कागलचे राजकारण नव्या वळणावर

Kolhapur- Mushrif-Ghatge alliance: चेहऱ्यावरचा ताणतणाव... न खोललेले पत्तेच जास्त
समीर देशपांडे
कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीत घाटगे हे मंगळवारी कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी आपल्या चेहऱ्यावरील ताण लपवू शकत नव्हते. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ‘मुंबईतील वरिष्ठांच्या आदेशानुसार, अदृश्य शक्तीच्या सूचनेनुसार झालेल्या या युतीबाबतची भूमिका स्पष्ट करताना अगदी ठरल्यासारखे दोघेही बोलत होते. दोघांनीही सोमवारी सविस्तर पत्रक काढून आधीच वातावरण निर्मिती केली होती. त्याच नियोजनाचा पुढचा टप्पा म्हणून त्यांनी ही पत्रकार परिषद घेतल्याचे दिसून आले.
गेल्या दहा वर्षांत मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातून विस्तव जात नव्हता, परंतु अचानक सोमवारी सकाळपासून युतीच्या बातम्या येऊ लागल्या आणि कागलसह जिल्हा आश्चर्यात बुडाला. समरजीत मुंबईहून परतले, तर मुश्रीफ मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर खास विमानाने कोल्हापुरात आले. कागलमधील तयारी व्हायची होती. म्हणून ते काही वेळ जिल्हा बँकेत थांबले. यानंतर, दोघेही कागलमधील पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. घाटगे यांनी पूर्ण पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांना ‘नामदार आणि साहेब’ असे संबोधत होते, तर मुश्रीफ ‘राजे’ असा उल्लेख करत होते. आधी गुद्यावर झालेला संघर्ष विकासाच्या मुद्द्यावर संपल्याचे दोघांनीही जाहीर केले. या दोघांनीही जेवढे सांगितले, त्याहून जास्त प्रश्न अनुत्तरितच राहिले.
ही युती व्हावी, म्हणून या दोघांपैकी कोणी पुढाकार घेतला, हे गुलदस्त्यातच राहिले, तर नेमके ‘वरिष्ठ’ कोण, याचेही स्पष्ट उत्तर शेवटपर्यंत दोघांनीही दिले नाही. सध्या राज्यातील एकच व्यक्ती या दोघांना आदेश देऊ शकते. त्यांनीच हे सर्व घडवून आणल्याचे उघड गुपित असतानाही घाटगे यांनी मात्र ‘योग्य वेळी पत्ते खोलू’ हेच पालुपद कायम ठेवले. ईडीच्या विषयावरही न्यायालयीन प्रकरण सांगून दोघांनीही अधिक भाष्य टाळले. एकूणच अतिशय सावधपणे दोघांनीही भूमिका मांडली आणि कागलच्या माळावर नव्या युतीची बीजे पेरली.
जिल्हा परिषदेचे जागावाटपही ठरले
कागल तालुक्यातील हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातील युतीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागावाटपाचा ही फॉर्म्युला ठरल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील सहापैकी तीन जागा मुश्रीफ गटाला, दोन जागा संजयबाबा घाटगे गटाला, तर जिल्हा परिषदेची एक जागा समरजित घाटगे यांच्या गटाला देण्याचे निश्चित झाल्याचे समजते.