...तर पाच हजार रुपयेहीे घेऊन फिरा!,आयुक्तांनी समजावले दिव्यांगांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:57 PM2020-03-05T18:57:06+5:302020-03-05T18:58:26+5:30

कोल्हापूर : ‘प्लास्टिकची पिशवी घेऊन फिराल तर सोबत पाच हजार रुपयेसुद्धा घेऊन फिरा,’ असा इशारावजा सल्ला आयुक्त डॉ. मल्लिनाथ ...

... then return five thousand rupees !, Commissioner explained to the disabled | ...तर पाच हजार रुपयेहीे घेऊन फिरा!,आयुक्तांनी समजावले दिव्यांगांना

...तर पाच हजार रुपयेहीे घेऊन फिरा!,आयुक्तांनी समजावले दिव्यांगांना

Next
ठळक मुद्दे...तर पाच हजार रुपयेहीे घेऊन फिरा!आयुक्तांनी समजावले दिव्यांगांना

कोल्हापूर : ‘प्लास्टिकची पिशवी घेऊन फिराल तर सोबत पाच हजार रुपयेसुद्धा घेऊन फिरा,’ असा इशारावजा सल्ला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी दोन दिव्यांगांना दिला. दिव्यांगांचेच प्रबोधन करीत त्यांनी कोल्हापूर शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, तेव्हा तुम्हीही सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

महापालिकेत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, लेखापाल संजय सरनाईक तसेच अन्य अधिकारी पालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात थांबले होते. त्याचवेळी दोन अंध व्यक्ती महापालिकेत आल्या. त्यांना बोलावून घेऊन आयुक्त कलशेट्टी यांनी ‘तुम्ही का आला आहात?’ अशी विचारणा केली. तेव्हा आम्ही आयुक्तांना भेटायला आलोय,’ असे त्या दिव्यांगांनी सांगितले.

‘मीच कलशेट्टी आहे. बोला, काय काम आहे?’ असे विचारता गडबडीने त्या दोन अंध व्यक्ती आपल्या पिशवीत काहीतरी कागद शोधू लागल्या. त्यांना कागद काही सापडत नाहीत असे लक्षात येताच कलशेट्टी यांनी स्वत: त्यांच्या पिशवीत कागद शोधायला सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नाच त्यांना प्लास्टिकची पिशवी सापडली.

‘अरेरे... शहरात प्लास्टिक बंदी आहे. प्लास्टिक पिशवी घेऊन फिरणार असाल तर पाच हजार रुपयेही घेऊन फिरा.’ ‘प्लास्टिक पिशवी वापरल्याबद्दल दंड होतो, माहीत आहे की नाही तुम्हाला?’ असे सांगताच ते अंधही गोंधळून गेले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली. यापुढे प्लास्टिक पिशवी वापरणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जनसंपर्क अधिकाऱ्यांना बजावले

कोणीही दिव्यांग अथवा ज्येष्ठ व्यक्ती कोणाही अधिकाऱ्यांना भेटायला आल्या असतील तर त्यांना जनसंपर्क कार्यालयात आणून सोडावे, अशी सूचना आयुक्तांनी सुरक्षारक्षकांना दिली. जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी यांना सूचना देताना आयुक्तांनी सांगितले की, तुम्ही बातम्या देण्याएवढेच काम करू नका. येथे येणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांची सौजन्याने विचारपूस करा. त्यांना पिण्यास पाणी द्या, बसायला जागा द्या. त्यांचे काम जाणून घ्या आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी आलेल्या व्यक्तींची भेट घालून द्या.

 

Web Title: ... then return five thousand rupees !, Commissioner explained to the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.