कोल्हापूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर उपचार सुरू असताना नागाळा पार्कातील एका हॉस्पिटलमध्ये सफाई करणाऱ्या महिलेने जखमी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. रविवारी (दि. २३) घडलेला हा प्रकार लक्षात येताच रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याची भीती घातली. त्यानंतर सफाई कर्मचारी महिलेने चोरलेले मंगळसूत्र परत केले. दरम्यान, जखमी महिलेला सीपीआरमध्ये हलवल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.रुग्णाच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री झालेल्या अपघातात ५० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली होती. जयसिंगपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार घेतल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रविवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने, हातातील बांगड्या मुलाच्या ताब्यात दिल्या. त्याचवेळी गळ्यात मंगळसूत्र असल्याचे कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले होते.त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी रुग्णाला सीपीआरमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईक रुग्णाचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले. याबाबत विचारणा करताच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी हात झटकले. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही त्यांनी धुडकावून लावली. अखेर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याची भीती घालताच एका सफाई कर्मचारी महिलेने चोरलेले मंगळसूत्र परत केले. या प्रकाराने संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली.टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकारउपचाराचा खर्च लाखोंच्या घरात असतो. एवढे करूनही रुग्ण वाचेल की नाही, याची खात्री नसते. अशा स्थितीत रुग्ण आणि नातेवाईकांना आधार देण्याऐवजी त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याची प्रवृत्ती अतिशय हीन आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार चीड आणणारा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
अपघातात दगावलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी, कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला हीन प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:54 IST