सतीश पाटीलशिरोली : अमेरिका–इस्रायल -इराण या देशांमधील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटू लागला असून, त्याची झळ कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रालाही बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः कोल्हापुरातील फौंड्री उद्योग आणि ऑटोमोबाईल उद्योगावर पुढील २५ दिवसांत इंधन व ऑइल टंचाईमुळे मंदीचे सावट गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कोल्हापूर औद्योगिक क्षेत्र राज्यातील महत्त्वाचे असून, येथे फौंड्रीमध्ये तयार होणारे कास्टिंग, वाहनाचे सुटे भाग, रेल्वेचे सुटे भाग, ट्रॅक्टर, ट्रक, चारचाकी गाड्यांचे सुटे भाग, हे उद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. येथील उत्पादन अमेरिका आणि युरोपीय देशांत निर्यात केले जाते. तसेच फौंड्रीसाठी लागणारा कोळसा हा ९० टक्के आयात होतो. मात्र, युद्धस्थिती कायम राहिल्यास निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. सध्या कास्टिंग निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर आधीच उच्च पातळीवर आहेत. पीग आयर्न प्रती टन सुमारे ४३,००० रुपये, कोळसा ४१,००० रुपये आणि स्क्रॅप ३५,००० रुपये दराने उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर युद्ध दीर्घकाळ चालल्यास कच्च्या मालाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः कोळशाचा सुमारे ९० टक्के पुरवठा आयातीवर अवलंबून असल्याने दरवाढीचा मोठा फटका उद्योगांना बसू शकतो. इंधन आणि ऑइलचा साठा मर्यादित असल्याने पुढील काही आठवड्यांत उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ उद्योजकांचे मत आहे. उत्पादन खर्च वाढल्यास ऑटोमोबाईल उद्योगालाही त्याचा फटका बसणार असून, वाहनांचे दर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी बाजारपेठेत मागणी कमी होऊन मंदीचे वातावरण निर्माण होऊ शकते.
आखातातील युद्धाचा परिणाम थेट भारतीय उद्योगावर झाला असून, फौंड्री उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव पुढील १५ ते २० दिवसांत वाढतील. निर्यातीवर परिणाम झाला आहे. - एम. बी. शेख, उद्योजक
सध्या आखाती देशात सुरू असलेले युद्ध पुढील २५ ते ३० दिवसांत थांबले नाही तर कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगावर परिणाम होण्याबरोबर निर्यातीवरही परिणाम होईल. - निरज झंवर, फौंड्री उद्योजक
Web Summary : The US-Israel-Iran conflict threatens Kolhapur's foundry and automobile industries. Potential fuel and oil shortages may cause a recession within 25 days, impacting exports and increasing raw material costs.
Web Summary : अमेरिका-इजराइल-ईरान संघर्ष से कोल्हापुर के फाउंड्री और ऑटोमोबाइल उद्योग खतरे में हैं। संभावित ईंधन और तेल की कमी से 25 दिनों के भीतर मंदी आ सकती है, जिससे निर्यात प्रभावित होगा और कच्चे माल की लागत बढ़ेगी।