Kolhapur: किरणोत्सवामध्ये अडथळा ठरणारे दोन खांब पुन्हा तेथेच, बदल करण्यास पुरातत्व खात्याचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:29 IST2025-08-05T12:26:38+5:302025-08-05T12:29:21+5:30
तेंव्हा होकार आता नकार..!

Kolhapur: किरणोत्सवामध्ये अडथळा ठरणारे दोन खांब पुन्हा तेथेच, बदल करण्यास पुरातत्व खात्याचा नकार
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या गरुड मंडपाच्या दोन खांबांचा गेली कित्येक वर्षे अंबाबाईच्या किरणोत्सवात अडथळा येत आहे. समोरचे हे दोन खांब फक्त एक एक फुटाने सरकवल्यास पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होऊन सात दिवसांचा सोहळा होणार आहे.
अनायसे ही बदलाची संधी मिळालेली असताना पुरातत्व खात्याकडून मात्र त्यासाठी नकारघंटा दिली जात आहे. आज मंगळवारी हे दोन खांब बसवले जाणार आहेत. पण जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले तर बदल होऊ शकतो.
श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे खांब मागील आठवड्यापासून बसवले जात आहेत. अगदी समाेरच्या बाजूला असलेले दोन खांब कायमच अंबाबाईच्या किरणोत्सवात अडथळा ठरायचे. मात्र मागील दोन वर्षांपासून गरुड मंडप नसल्याने अंबाबाईचे वर्षातून दोन वेळा होणारे किरणोत्सव सात दिवस आणि प्रखर सूर्यकिरणांसह झाले.
हा बदल लक्षात आल्यानंतर काही जणांनी देवस्थान समितीला दोन्ही खांब एक एक फुटांनी सरकवण्याचा सल्ला दिला होता. पण प्रत्यक्ष खांब बसविण्याची वेळ आली तेंव्हा मात्र पुरातत्व खात्याने नकारघंटा वाजवत खांब तिथेच बसविण्याचा हट्ट धरला आहे.
तेंव्हा होकार आता नकार..!
दोन खांब फक्त एक एक फुटांनी मागे सरकवायचे आहेत. त्यामुळे गरुड मंडपाच्या रचनेत कोणताही बदल होणार नाही. याआधी समितीनेदेखील हा विषय पुरातत्व खात्याला सांगून खांब फुटाने सरकवण्यास सांगितले होते, त्यांनीदेखील होकार दिला होता. पण आता नकार दिल्याचे समितीकडून समजले.