Kolhapur- चालक चहा पिण्यासाठी उतरला, ..अन् बाघबीळ घाटात टँकर दरीत घसरला; सुदैवाने जिवीतहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 13:21 IST2023-03-31T13:21:00+5:302023-03-31T13:21:19+5:30
टँकर हळूहळू मागे सरकत असल्याचे लोकांच्या लक्षात येताच उपस्थितांनी आरडाओरडा केला

Kolhapur- चालक चहा पिण्यासाठी उतरला, ..अन् बाघबीळ घाटात टँकर दरीत घसरला; सुदैवाने जिवीतहानी टळली
पन्हाळा: पन्हाळा मार्गावरील वाघबीळ घाटात चढावर उभा असलेला पाण्याचा टँकर दरीत घसरल्याची घटना घडली. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी घडली नाही. एका झाडाला टँकर अडकल्याने मोठे नुकसान टळले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील एका निवासी शाळेला टँकरच्या साहाय्याने पिण्याचे पाणी पुरवले जाते. नेहमीप्रमाणे आज, टँकर चालक पाणी घेऊन वाघबीळकडे येत होता. दरम्यान चालक रस्त्याच्या चढतीला टँकर उभा करून चहा पिण्यासाठी उतरला. तेव्हा काही वेळात अचानक टँकर हळूहळू मागे सरकण्यास सुरवात झाली. लोकांच्या लक्षात येताच तेथे उपस्थित लोकांनी आरडाओरडा करत रस्त्यावरील वाहने, थांबलेल्या दुचाकी बाजूला केल्या.
हा टँकर पाणी भरलेला असल्याने रस्त्याच्या उतारावर टँकरचा वेग वाढला आणि वाघबीळ थांब्याच्या दरीत गेला. सुदैवाने मागे एक झाड असल्याने टँकर झाडाला धडकून अडकला. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला.