जागतिक ब्रदर्स डे : मित्र अन् सखा...भाऊ माझा पाठीराखा; कोल्हापूरच्या राजकीय विश्वात बंधूप्रेमाचा अनोखा 'बंध'

By पोपट केशव पवार | Updated: May 24, 2025 13:22 IST2025-05-24T13:16:19+5:302025-05-24T13:22:52+5:30

स्वत: मागे राहत भावांच्या यशासाठी दिले पाठबळ

The support of their brothers behind the leaders in Kolhapur politics | जागतिक ब्रदर्स डे : मित्र अन् सखा...भाऊ माझा पाठीराखा; कोल्हापूरच्या राजकीय विश्वात बंधूप्रेमाचा अनोखा 'बंध'

जागतिक ब्रदर्स डे : मित्र अन् सखा...भाऊ माझा पाठीराखा; कोल्हापूरच्या राजकीय विश्वात बंधूप्रेमाचा अनोखा 'बंध'

पोपट पवार

कोल्हापूर : भाऊ लहान असो वा मोठा प्रत्येकासाठी आपला भाऊ हा भरभक्कम आधारच असतो. अगदी शालेय जीवनापासून ते करिअरपर्यंतच्या प्रवासात भावाची साथ मोलाची ठरते. अनेकजण स्वत: मागे राहत आपल्या भावासाठी सुखकर वाट करून देतात हा इतिहास आहे. त्याला राजकारणाचे क्षेत्रही अपवाद नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अशा अनेकांनी आपल्या भावासाठी त्याग केला आहे. आज २४ मेच्या ‘जागतिक ब्रदर्स डे’ निमित्ताने घेतलेला हा धांडोळा..

आबिटकरांचे 'अर्जुनास्त्र'
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सलग तीनवेळा राधानगरी मतदारसंघातून विजय मिळवत जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थान भक्कम केले आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे लहान बंधू अर्जून आबिटकर यांचा सिंहाचा वाटा आहे. मंत्री आबिटकर यांच्याकडे महत्त्वाचे आरोग्य खाते असल्याने त्यांना राज्याचा कारभार पाहावा लागतो. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक असलेल्या अर्जुन यांच्या खांद्यावरच मतदारसंघातील सारी धुरा आहे.

पाटलांचे बंधूप्रेम
काँग्रेसचा राज्याचा चेहरा म्हणून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या राजकीय वाटचालीत मोठे बंधू डॉ. संजय डी. पाटील यांची साथ मोलाची ठरली आहे. कोणत्याही निवडणुकीत थेटपणे समाेर न येता पडद्यामागून बळ देत त्यांनी सतेज पाटील यांची राजकीय कारकीर्द समृद्ध केली आहे. या दोन्ही बंधूंमधील प्रेम अन् जिव्हाळा अनेकदा जाहीर कार्यक्रमात पाहायला मिळतो. ‘बंटी माझं हार्ट आहे’ हे त्यांनी बोलून दाखवले आहे.

यड्रावकरांचा विजय म्हणजेच 'संजय'
शिरोळ मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवलेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गुलालाचा अर्थ त्यांचे लहान बंधू संजय पाटील-यड्रावकर यांच्या बंधुप्रेमात दडला आहे. 'भावासाठी कायपण' ही करण्याची तयारी असलेले संजय पाटील जयसिंगपूर नगरपरिषदेच्या राजकारणात सक्रिय असले तरी विधानसभेला थोरल्या भावासाठी जीवाचे रान करतात.

विनय-निपुण जोडी भारी
पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांच्या राजकारणाचा बाज सहकारक्षेत्र राहिला आहे. वारणेच्या सहकाराची समृद्ध परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांचे बंधू निपुण कोरे करत असून विनय कोरे यांच्या विजयाची ताकद निपुण यांच्या नियोजनात दडली आहे.

'चंद्रदीप' याचे गीत अजित
‘करवीर’मधून तीनवेळा विजयश्री मिळविलेल्या चंद्रदीप नरके यांना लहान बंधू अजित नरके यांची नेहमीच साथ मिळाली आहे. करवीरच्या राजकारणात अजित नरके आपली मांड ठेवून आहेत.

महाडिक बंधूंचा एकोपा
कोल्हापूर दक्षिणमधून दोनवेळा गुलाल घेतलेले अमल महाडिक यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे मोठे बंधू स्वरुप महाडिक यांची साथ लाभली आहे तर इचलकरंजी मतदारसंघातून पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या राहुल आवाडे यांना गुलाल लावण्यात मोठे बंधू स्वप्निल आवाडे यांच्या जनसंपर्काचाही मोठा वाटा राहिला आहे.

Web Title: The support of their brothers behind the leaders in Kolhapur politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.