मानधनासाठी वृद्ध कलावंतांचा संघर्ष सुरूच, गेल्या सहा महिन्यापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 19:05 IST2026-03-23T19:05:56+5:302026-03-23T19:05:56+5:30
१२५ कोटी रुपये वाढीव खर्चास मान्यताही मिळालेली होती.

मानधनासाठी वृद्ध कलावंतांचा संघर्ष सुरूच, गेल्या सहा महिन्यापासून वंचित
कोल्हापूर : वृद्ध कलावंतांना शासनाकडून मिळणाऱ्या मानधनात वाढ झाली असली तरी गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना ते मिळाले नाही. राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक आणि कलाकार मानधन योजनेत सुधारणा करून पाच हजार रुपये सरसकट मानधन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यासाठी १२५ कोटी रुपये वाढीव खर्चास मान्यताही मिळालेली होती.
पूर्वी वृद्ध कलावंतांचे अ, ब, क असे वर्गीकरण केलेले होते. अ वर्गाला ३ हजार १५०, ब वर्गाला २ हजार ७५०, तर क वर्गातील कलावंतांना २ हजार २५० रुपये मानधन दिले जात होते. कलावंतांमधील भेदभाव नष्ट करून सर्वांना एकाच वर्गात सामावून घ्यावे, तसेच सर्वांचे मानधन समान करून प्रत्येकाला ५ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केली होती.
शासनाकडून ही मागणी मान्य झाली. त्यामुळे वृद्ध कलावंत आनंदी होते. एप्रिल महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊन पाच हजार रुपये मानधन मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र सहा महिने झाले तरी वृद्ध कलावंतांना मानधन मिळाले नाही.
शासनाच्या आदेशाप्रमाणे पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी वृद्ध कलावंतांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. कलावंतांचे आधार कार्ड पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मानधन मिळेल असे शासनाकडून सांगण्यात आल्याचे लोककलावंत संघटनेकडून सांगण्यात आले. गेली सहा महिने आमचे मानधन बंद आहे. माझे वय ८६ आहे आणि माझ्यासारखे ३२ वृद्ध कलावंत मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. -संपतराव दिंडे, तबलावादक, पोतनीस बोळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर