Kolhapur: स्वार्थी, बुद्धिजीवी वर्गामुळे देशात क्रांती अशक्य - राधेश्याम जाधव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:24 IST2025-04-15T15:24:09+5:302025-04-15T15:24:41+5:30

'बाबासाहेबांनी आपला नेता कितीही महान असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य विकू नका, अन्यथा तो हुकूमशहा बनतो, हा लोकशाहीविषयी दिलेला इशारा आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा'

The struggle for social justice and the need for intellectual leadership says Radheshyam Jadhav | Kolhapur: स्वार्थी, बुद्धिजीवी वर्गामुळे देशात क्रांती अशक्य - राधेश्याम जाधव 

Kolhapur: स्वार्थी, बुद्धिजीवी वर्गामुळे देशात क्रांती अशक्य - राधेश्याम जाधव 

कोल्हापूर : सामाजिक न्यायासाठी संघर्ष आणि बुद्धिजीवी नेतृत्वाची गरज असते. ज्या देशातील बुद्धिजीवी वर्ग स्वार्थी, अप्पलपोटी होतो, शोषितांशी नाळ तोडतो तो देश कधीच प्रगती करत नाही, क्रांती करत नाही. क्रांती करायची असेल तर शोषितांमधील बुद्धिजीवी वर्गाने नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. राधेश्याम जाधव यांनी व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट’तर्फे आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक न्याय’ या विषयावर विवेचन केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाले, बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या वाक्यामध्ये संघर्ष हा सकारात्मक होता. आपण शोषितांच्या लढ्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याकडे देत आहोत, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जेव्हा सर्वत्र अंधार असतो, आम्ही कुणाकडे बघून लढू असा प्रश्न तयार होतो तेव्हा लढण्याची प्रेरणा तुम्हाला स्वत:मधूनच घ्यावी लागते. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवता येणार नाही. आपण २०२५ मधील भारताचा विचार करतो त्यावेळी बुद्धिप्रामाण्यवादी समताधिष्ठित समाजरचना हा सामाजिक न्याय स्थापनेचा उपाय आहे. डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत प्रास्ताविक केले.

जातीच्या चौकटीतून मुक्त करा

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांनी आयुष्यभर समाजाचे वैचारिक प्रबोधन केले. सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला; पण आपण त्यांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले आहे. अनुयायांनी ही चौकट दूर करून त्यांना मुक्त करावे. बाबासाहेबांनी आपला नेता कितीही महान असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य विकू नका, अन्यथा तो हुकूमशहा बनतो, हा लोकशाहीविषयी दिलेला इशारा आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे.

तरीही गर्दी..

आंबेडकर जयंतीनिमित्त या व्याख्यानाची ट्रस्टकडून फारशी पूर्वप्रसिद्धी केली नव्हती. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही माध्यमांकडे पाठवण्याचे कष्ट कुणी घेतले नव्हते. तरीही आंबेडकरप्रेमींनी व्याख्यानास गर्दी केली.

Web Title: The struggle for social justice and the need for intellectual leadership says Radheshyam Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.