गुन्हा करून नाही सुटणार; ही ‘व्हॅन’ जागेवर पुरावे देणार !; राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ व्हॅन दिल्या जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:45 IST2025-08-27T18:45:03+5:302025-08-27T18:45:30+5:30
गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढणार

गुन्हा करून नाही सुटणार; ही ‘व्हॅन’ जागेवर पुरावे देणार !; राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ व्हॅन दिल्या जाणार
कोल्हापूर : सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य आहे. यासाठी राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दिल्या जाणार आहेत. या व्हॅनमध्ये रासायनिक विश्लेषण करणारी उपकरणे, डीएनए-रक्त नमुन्यांसाठी विशेष किट्स आणि डिजिटल पुरावे जमा करण्याची साधने उपलब्ध असतील. त्यामुळे खून, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांत तक्रारदार, साक्षीदार फितूर झाल्यामुळे किंवा सबळ पुराव्यांअभावी आरोपी सुटणार नाहीत.
काय आहे फॉरेन्सिक व्हॅन
अनेक गंभीर गुन्ह्यात सबळ पुरावे उपलब्ध नसल्याने किंवा फिर्यादी, साक्षीदार फितूर झाल्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी सक्षम पुरावे गरजेचे असतात. यासाठी राज्य सरकारने मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्हॅन गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन पुरावे जमवणार तसेच त्याचे रासायनिक विश्लेषण करून आरोपींच्या विरोधातील सबळ पुरावे पोलिसांना देणार आहे.
सध्या एक व्हॅन उपलब्ध
राज्य सरकारने घोषणा करण्यापूर्वीच कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाकडे एक फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी फॉरेन्सिक व्हॅन तयार करवून घेतली होती. आता नवीन योजनेंतर्गत एक व्हॅन जिल्हा पोलिस दलास मिळण्याची शक्यता आहे.
व्हॅनमध्ये असलेल्या सुविधा
मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये पुरावे जमा करण्यासाठी डिजिटल साधने आणि उपकरणे असतील. रक्ताचे नमुने घेणे, त्यांचे रासायनिक विश्लेषण करणे, यासाठी लागणाऱ्या आवश्यक कीट व्हॅनमध्ये असतील. हे सर्व काम पाहण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही व्हॅनसोबत असेल. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे तपास गतिमान होणार आहे. तसेच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यास मदत होणार आहे.
आता गुन्हेगारांची खैर नाही
फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारांच्या विरोधातील सक्षम पुरावे मिळविण्यास मदत होणार आहे. काही फिर्यादी आणि साक्षीदार न्यायालयात फितूर झाले तरी पुरावे उपलब्ध असल्याने गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचविता येणार आहे.
पुरावे जमा करण्याच्या पारंपरिक पद्धतीतील मर्यादा लक्षात घेऊन सरकारने पोलिसांना मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच यातील व्हॅन उपलब्ध होईल. यामुळे न्यायालयात गुन्हे सिद्ध होऊन आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे प्रमाण वाढेल. - रवींद्र कळमकर - पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा