कोल्हापुरात राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, रशियन डीजेचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 13:16 IST2023-09-20T13:15:14+5:302023-09-20T13:16:42+5:30
मिरवणूक पाहण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी, झगमगाटही वाढला

कोल्हापुरात राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, रशियन डीजेचे आकर्षण
कोल्हापूर : पोलिसांनी वारंवार केलेल्या आवाहनाला बगल देत गणेश मंडळांनी मंगळवारी (दि. १९) रात्री राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट केला. सुमारे सहा तास चाललेल्या मिरवणुकीतील आवाजाने परिसरातील नागरिकांचे कान गच्च झाले, तर डोके बधिर झाले. प्रचंड उत्साहात निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली.
गणेश आगमनाच्या मिरवणुकीत मंडळांनी आवाजमर्यादेचे पालन करावे, तसेच लेसर किरणांचा वापर टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. शिवाय स्ट्रक्चरची उंची आणि रुंदी मर्यादित ठेवण्याच्या सूचनाही मंडळांना केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र आगमनाच्या मिरवणुकीत बहुतांश मंडळांनी पोलिसांच्या सूचनांना फाटा देऊन डीजेच्या प्रचंड दणदणाटात मिरवणूक काढली. सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेली मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.
डीजेच्या कान गच्च करणाऱ्या आवाजासोबतच विद्युत रोषणाई, शार्पी आणि लेसरच्या किरणांनी राजारामपुरीतील प्रमुख दोन रस्ते उजळून निघाले. डीजेच्या ठेक्यावर ताल धरत मंडळांनी प्रचंड जल्लोष केला. यात तरुणींचाही मोठा सहभाग होता. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. राजारामपुरी, विक्रमनगर, टेंबलाईवाडी येथील ४३ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
विद्युत पुरवठा खंडित
मंडळांचे स्ट्रक्चर अवाढव्य असल्याने विद्युततारांना स्पर्श होऊन दुर्घटना होऊ नये, यासाठी महावितरणने मिरवणुकीच्या काळात राजारामपुरीतील विद्युत पुरवठा खंडित केला. मंडळांच्या विद्युत रोषणाईने आसमंत उजळून निघाला.
पावसाची रिमझिम अन् उत्साहाला उधाण
सायंकाळी काही वेळ पावसाने हजेरी लावली. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी झेलत मंडळांनी मिरवणूक सुरू ठेवली. रात्री उशिरापर्यंत उत्साहाला उधाण कायम होते.
कडेकोट बंदोबस्त
आगमन मिरवणुकीसाठी पोलिसांनी राजारामपुरीत कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. दुपारपासूनच या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मिरवणूक मार्गावर फिरून पाहणी केली. शहर उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक तानाजी सावंत, अनिल तनपुरे, महादेव वाघमोडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या हाती ध्वनिमापक यंत्रे मात्र कुठेच दिसली नाहीत.
पारंपरिक वाद्यांना बगल, रशियन डीजेचे आकर्षण
आगमनाच्या मिरवणुकीत यंदा मंडळांनी पारंपरिक वाद्यांना बगल देऊन डीजे आणि विद्युत रोषणाईला प्राधान्य दिले. काही मोजक्या मंडळांनीच ढोलपथकांसोबत मिरवणुकीत सहभाग घेतला. राजारामपुरी पहिली गल्ली मंडळाने आणलेल्या रशियन डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी तरुणाईने प्रचंड गर्दी केली होती.