कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात, शांतता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 04:22 PM2023-06-07T16:22:14+5:302023-06-07T16:30:15+5:30

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही

The situation in Kolhapur is under control says Collector Rahul Rekhawar | कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात, शांतता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी 

कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात, शांतता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी 

googlenewsNext

कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात आज, बुधवार (दि.७) सकाळपासून मोठा तणाव निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्याकडून अनेक दुकानगाळे, हातगाड्या, दुचाकी तसेच काही परिसरात मोठी तोडफोड केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराच्या कांड्याही फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारनंतर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली. 

शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पाहणी करत परिस्थितीची माहिती दिली. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोल्हापुरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी निश्चिंत रहावे. सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा आणि प्रगतशील जिल्हा राहिला आहे. शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेवून आजवर कोल्हापूर जिल्ह्याने जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार  दिला आहे. जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. कोल्हापूरचा सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करुन प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

अफवांना बळी पडू नये - सुनील फुलारी

सोशल मिडियावरील अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. तसेच अनावश्यक घराबाहेर पडून गर्दीत भर घालू नये, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले. परिस्थितीचा फायदा घेवून लोकांना घाबरवणाऱ्या व दंगा घडवून आणणाऱ्या गुंडांना शोधण्यात येत असून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु राहणार आहे. झालेल्या नुकसानीची दखल घेवून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी पालन करावे. पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना संरक्षण देण्यास पूर्णतः कटिबद्ध असून कोणतीही अडचण आल्यास स्थानिक पोलिस अधिकारी, पोलीस स्टेशन अथवा पोलीस प्रशासनाशी नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहनही फुलारी यांनी केले.

पालकमंत्री केसरकर परिस्थितीचा आढावा घेणार

दरम्यानच, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 4.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे त्याचे आगमन होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात सायं. 5.30 वाजता शहरातील तणावाच्या परिस्थिती नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

Web Title: The situation in Kolhapur is under control says Collector Rahul Rekhawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.