Kolhapur Crime: कारागृहातून पळालेल्या कैद्याचा तपास एलसीबीकडे, गेल्या अडीच महिन्यांपासून पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:07 IST2025-10-20T15:06:45+5:302025-10-20T15:07:26+5:30
कैदी सुरेश चोथे मोकाट

Kolhapur Crime: कारागृहातून पळालेल्या कैद्याचा तपास एलसीबीकडे, गेल्या अडीच महिन्यांपासून पसार
कोल्हापूर : कळंबा कारागृहाच्या सर्व्हिसिंग सेंटरवरून ग्राहकाची कार घेऊन पळालेला जन्मठेपेच्या शिक्षेतील कैदी सुरेश आप्पासो चोथे (वय ३८, रा. चोथेवाडी, ता. गडहिंग्लज) याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. गेल्या अडीच महिन्यांपासून तो पसार आहे. तो अजूनही जुना राजवाडा पोलिसांना सापडत नसल्याने पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी शनिवारी (दि. १८) याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच एलसीबीकडे वर्ग केला.
अनैतिक संबंधातून गडहिंग्लज तालुक्यातील एका शिक्षकाचा खून केल्याप्रकरणी सुरेश चोथे याला सिंधुदुर्ग न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो ऑगस्ट २०२२ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. चांगल्या वर्तनामुळे त्याला खुल्या कारागृहातील कामे दिली जात होती. २४ जुलै २०२५ रोजी कारागृहासमोरील खुल्या जागेत सर्व्हिसिंग सेंटरवर काम करताना तो ग्राहकाची कार घेऊन पळाला होता.
त्याने पळवलेली कार दोन दिवसांनी कोकणात वैभववाडी येथील बाजारपेठेत एका हॉटेलसमोर पोलिसांना सापडली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही जुना राजवाडा पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर मात्र तपास रखडला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह इतर कामांमध्ये पोलिस अडकल्याने तपास होऊ शकला नाही, अशी कारणे पोलिसांकडून सांगितली जात आहेत. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी जुना राजवाडा पोलिसांकडून आढावा घेऊन पुढील तपास एलसीबीकडे सोपवला.
अडीच महिने कैदी मोकाट
कैदी चोथे हा ग्राहकाची कार घेऊन थेट कोकणात गेला. वैभववाडी बाजारपेठेत कार सोडून तो पुढे निघून गेला. तो कर्नाटकातील सीमाभागात लपला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. यासाठी त्याला त्याच्या काही मित्रांनी मदत केल्याचा संशय आहे. पोलिसांकडून त्याच्या मित्रांची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कळंबा कारागृहातून पसार झालेला कैदी सुरेश चोथे याचा तपास नुकताच एलसीबीकडे आला आहे. त्याची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याच्या मुसक्या आवळू. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, एलसीबी