वर्ष उलटले; 'नकोशी' च्या आई वडिलांचा शोध सुरुच; कोल्हापुरातील कसबा बावड्यात सापडली होती कचऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:02 IST2025-01-02T17:02:15+5:302025-01-02T17:02:32+5:30
दीपक जाधव कदमवाडी : कोल्हापुरात गेल्यावर्षी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याच नियोजन सुरू असताना असे कसबा बावड्यात ...

वर्ष उलटले; 'नकोशी' च्या आई वडिलांचा शोध सुरुच; कोल्हापुरातील कसबा बावड्यात सापडली होती कचऱ्यात
दीपक जाधव
कदमवाडी : कोल्हापुरात गेल्यावर्षी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याच नियोजन सुरू असताना असे कसबा बावड्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील गजबजलेल्या एका पेट्रोल पंपाच्यासमोर रस्त्याच्या कडेला एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. त्या निर्दयी आई वडिलांचा शोध आज वर्ष लोटले तरी शाहुपुरी पोलिसांकडून सुरुच आहे.
कसबा बावडा येथे श्रीराम सेवा सोसायटीच्या पेट्रोल पंपाच्या समोर उघड्यावर असणाऱ्यां कचरा कोडाळ्यात अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी एक दिवसाचे स्त्री जातीचे अर् टाकले होते. सकाळी महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येथे आले होते. उघड्या कोंडाळ्यातील पडलेला कचरा खोऱ्याने एकत्रित करत असताना कचऱ्यात लहान मुलाचा रडतानाचा आवाज आल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले.
यावेळी कचऱ्यामध्ये एका कापडात गुंडाळून एक दिवसाच स्त्री जातीचे अर्भक टाकलेले निदर्शनास आले. यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्वरित याची माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली. तसेच या अर्भकाला दुसऱ्या स्वच्छ कापडामध्ये घेऊन तत्काळ सेवा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते. सद्या ते बाळ बालकल्याण गृहात असून त्याच्या निर्दयी आई बापाला शोधण्यात वर्षभरात पोलिसांना अपयश आले आहे.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक नागेश यमगर व पोलीस हवालदार संदीप पाटील यांच्याकडे होता. त्यानी कोल्हापूर आणि परिसरातील खासगी व शासकीय रुग्णालयात नोंद असलेल्या गरोदर माताची बाळंतपण झालेल्या माताची माहिती संकलीत केली व पोलिस उपनिरीक्षक नागेश यमगर यांची बदली झाली. त्यानंतर त्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यात कोणतीही प्रगती झालेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरुच आहे. नकोशीच्या निर्दयी आई-वडिलांचा शोध कधी लागणार ? हा प्रश्नच आहे.
तत्कालीन तपास अधिकारी यांची बदली झाल्यानंतर माझ्याकडे तपास आला असून सध्या आपण या मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार कायम तपासावर असून तपास लागताच फाईल ओपन करून पुढे अधिक तपास करण्यात येईल. - क्रांती पाटील. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.