सोनसळी किरणांच्या साक्षीने रंगला शाही दसरा सोहळा, कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चाैकात सीमोल्लंघन
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 2, 2025 21:09 IST2025-10-02T21:09:27+5:302025-10-02T21:09:38+5:30
Kolhapur Dasara: मावळतीला निघालेली सोनेरी सूर्यकिरणे, करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालख्या, बंदुकीच्या फेरी झाडून सलामी, आसमंत उजळून टाकणारी आतिषबाजी, सरदार घराण्यातील मानकऱ्यांची उपस्थिती, शाही लवाजमा अशा वातावरणात गुरुवारी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा रंगला.

सोनसळी किरणांच्या साक्षीने रंगला शाही दसरा सोहळा, कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चाैकात सीमोल्लंघन
-इंदुमती सूर्यवंशी
कोल्हापूर - मावळतीला निघालेली सोनेरी सूर्यकिरणे, करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालख्या, बंदुकीच्या फेरी झाडून सलामी, आसमंत उजळून टाकणारी आतिषबाजी, सरदार घराण्यातील मानकऱ्यांची उपस्थिती, शाही लवाजमा अशा वातावरणात गुरुवारी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा रंगला. कोल्हापूरला लाभलेले धार्मिक अधिष्ठान आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांची संस्थानकालीन परंपरा या दोन्हींचा सुरेख संगम या शाही दसऱ्या सोहळ्यात पाहायला मिळाला. पावसानेही यावेळी उसंत घेतल्याने कोल्हापुरकरांनी अभूतपूर्व उत्साहात या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सुरांचा संहार करून भक्तांना अभय देणाऱ्या दुर्गेच्या नवरात्रोत्सवाची सांगता या शाही दसरा सोहळ्याने होते. अंबाबाई, तुळजाभवानी आपला विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी या शाही दसरा चौकात येतात तर दुसरीकडून शाहू छत्रपती ऐतिहासिक मेबॅक कार मध्ये विराजमान होऊन येतात. म्हैसूर नंतर कोल्हापुरात असा शाही दसरा साजरा होत आहे