Kolhapur: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘आबाजी-डोंगळे’ ठरणार निर्णायक, मंत्री मुश्रीफांच्या वक्तव्याने राजकारणाला उकळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:54 IST2025-04-15T15:54:08+5:302025-04-15T15:54:25+5:30

विरोधकांची सावध व्यूहरचना

The role of senior director Vishwas Patil Abaji and president Arun Dongle is important in the Gokul election | Kolhapur: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘आबाजी-डोंगळे’ ठरणार निर्णायक, मंत्री मुश्रीफांच्या वक्तव्याने राजकारणाला उकळी

Kolhapur: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘आबाजी-डोंगळे’ ठरणार निर्णायक, मंत्री मुश्रीफांच्या वक्तव्याने राजकारणाला उकळी

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सध्याच्या घडीला सर्वाधिक ठराव हे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) व अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडेच असल्याने आगामी निवडणुकीत या दोघांच्या भूमिकेला महत्त्व राहणार आहे. सध्या जरी ते सत्तारूढ गटासोबत असले तरी विरोधकांची व्यूहरचना पाहता, यातील एकाला ‘प्यादे’ करून विरोधकांनी सत्तेचा सारीपाट मांडला तर आश्चर्य वाटायला नको. बुद्धिबळाच्या पटावर प्यादे हे सर्वांत महत्त्वाचे आणि संख्यात्मकदृष्ट्या जास्त असलेले सैन्य आहे. प्याद्यांचा योग्य वापर केल्यास प्रतिस्पर्धकाला अडचणीत आणू शकतो, याची जाणीव नेत्यांना आहे.

गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ‘जय-वीरू’च्या जोडीने आगामी निवडणुकीत एकत्र राहावे, असे सूचक वक्तव्य करत मंत्री मुश्रीफ यांनी दोघांना सावध केल्याने राजकीय दूध ढवळून निघाले. ‘गोकुळ’च्या सत्तेसाठी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांनी अनेकवेळा प्रयत्न केले. सत्तारूढ गटातून विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांनी बंड केल्यानंतरच सत्तांतर शक्य झाले.

‘गोकुळ’च्या राजकारणातील या दोघांचे महत्त्व सर्वपक्षीय नेत्यांना चांगलेच माहीत आहे. संघाच्या निवडणुकीसाठी जेमतेम वर्ष राहिले आहे, सहा महिन्यांनी ठरावांची प्रक्रिया सुरू होणार आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर महायुती भक्कम झाल्याने ‘गोकुळ’ची आगामी निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा आग्रह नेत्यांचा आहे. सहकारात राजकारण आणायचे नाही, असा सल्ला मंत्री मुश्रीफ यांचा कायम असतो. आता, सतेज पाटील यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळण्यास सुरुवात केली आहे. हे जरी खरे असले तरी निवडणूक अटळ आहे.

सध्या ठरावाच्या पातळीवर सत्तारूढ गट ताकदवान आहे. विरोधात आता दिवंगत आमदार पी. एन. पाटील नाहीत, त्यात माजी आमदार महादेवराव महाडिक हे सक्रिय राजकारणातून बाजूला आहेत. त्यामुळे विरोधात मोट बांधायची झाल्यास खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक यांना पुढाकार घ्यावा लागेल. तसे प्रयत्नही सुरू झाले असून, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे यांना आपल्यासोबत घेण्याची व्यूहरचना आहे; पण मंत्री मुश्रीफ हे सतेज पाटील यांना सोडण्याची शक्यता धूसर आहे. जर मंत्री मुश्रीफ सोबत आलेच नाहीतर विरोधकांनी ‘प्लॅन बी’ची चाचपणी सुरू केली आहे.

नेत्यांसह विद्यमान संचालकांमध्ये विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्याकडे सध्या एक हजारापेक्षा अधिक ठराव असल्याने आगामी निवडणुकीत त्यांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे. या दोघांपैकी एकाला सोबत घेऊन टक्कर द्यायची रणनीती विरोधकांची आहे. तशा हालचाली सुरू असल्याने मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर कार्यक्रमात सूचक वक्तव्य करत दोघांनाही सावध केले आहे.

सत्तारूढ गटातील नेतेच नाराज

जिल्ह्यातील बहुतांशी नेते ‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटात आहेत; पण कारभार करताना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार सर्वच नेत्यांची आहे. काहींनी उघड नाराजीही व्यक्त केली आहे. त्यामुळे वेळ आल्यानंतर हे नेते आपापली भूमिका उघड करणार हे निश्चित आहे.

ठरावाची व्यक्तिगत ताकद असलेले संचालक

विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ, शौमिका महाडिक, अजित नरके, डॉ. चेतन नरके, अंबरीश घाटगे.

Web Title: The role of senior director Vishwas Patil Abaji and president Arun Dongle is important in the Gokul election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.