राज्य शासनाच्या सुंदर गाव योजनेचा निकाल फुटला, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 01:28 PM2023-12-22T13:28:54+5:302023-12-22T13:29:59+5:30

नियमबाह्यपणे निकाल कसा जाहीर झाला याबद्दल आश्चर्य

The result of the state government Sundar Gaon Yojana is out in Kolhapur District | राज्य शासनाच्या सुंदर गाव योजनेचा निकाल फुटला, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकार

संग्रहित छाया

कोल्हापूर : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत मूल्यमापन झालेल्या गावांचा निकाल फुटल्याचे गुरुवारी उघड झाले. शासन आदेशानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या समितीने निकाल जाहीर करणे बंधनकारक असताना हातकणंगले तालुक्यात परस्पर निकाल जाहीर झाला आहे. यामुळे नियमबाह्यपणे निकाल कसा जाहीर झाला, याबद्दल आश्चर्य व्यक्त आहे.

गावातील स्वच्छता, पारदर्शक कारभार, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरण रक्षणासाठीचे उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर या निकषावर गावांचे मूल्यमापन होते. योजनेची व्यापक प्रसिद्धी, मूल्यमापन, तालुका, जिल्हा तपासणी समिती स्थापन करणे, तालुका तपासणी समिती करणे आदी टप्प्यात तपासणीची प्रक्रिया राबवली जाते.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांचा अहवाल आल्यानंतर जिल्हा स्तरावरील समितीकडून तालुकानिहाय विजेत्या गावांची नावे जाहीर करतात. विजेत्यांना १६ फेब्रुवारीला आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विजेत्या ग्रामपंचायतींना बक्षीस वितरण करावे, असे शासन आदेशात म्हटले आहे. 

मात्र जिल्हा परिषदेच्या समितीलाच धाब्यावर बसून हातकणंगले तालुक्यातून सुुुंदर गावांचा निकाल जाहीर झाला आहे. समाज माध्यमात पुलाची शिरोली गावाला हा पुरस्कार मिळाल्याचे वृत्त व्हायरल झाले मात्र यासंबंधीची अधिकृत माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्रशासनाकडे नव्हती. परिणामी जिल्हास्तरीय समितीचा पुरस्कार वितरणाचा अधिकार वापरून तालुकास्तरावरूनच निकाल जाहीर झाल्यामुळे पुरस्कार निवड आणि जाहीर करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: The result of the state government Sundar Gaon Yojana is out in Kolhapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.