नवी डोकेदुखी!, सोशल मीडियावरील प्रोफाइल हे जोडणारे नव्हे, तर लग्न मोडणारे..
By विश्वास पाटील | Updated: July 21, 2025 15:34 IST2025-07-21T15:34:08+5:302025-07-21T15:34:44+5:30
मॅरेज ब्युरोकडील फेक प्रोफाइलमध्येही वाढ

AI Generated Image
विश्वास पाटील
कोल्हापूर : फेसबुक, इन्स्टावरील तुमचे प्रोफाइल पाहून लग्न जुळण्याचे नव्हे, तर मोडण्याचेच प्रमाण वाढू लागल्याचे अनुभव आहेत. स्थळ आले की मुली पटपट त्याचे सोशल मीडियावरील अकाउंटवर जाऊन त्याच्या वागणुकीची कुंडलीच काढू लागल्या आहेत. त्यामुळे तो घरी येऊन मुली पाहण्याचा कार्यक्रम होण्यापूर्वीच त्या स्थळाला नकार देऊ लागल्या आहेत. उपवर मुलींच्या आई-वडिलांसाठी ही नवी डोकेदुखी ठरत आहे, कारण मुलगी प्रत्येक स्थळाला नकार देऊ लागल्याने स्थळे शोधायची किती, असा पेच त्यांच्यासमोर आहे.
कोल्हापुरातील तो तरुण, तसा देखणा. निर्व्यसनी. हायस्कूलमध्ये क्रीडाशिक्षक. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली; परंतु त्याच्या सोशल अकाउंटवर तो गणेशोत्सवात ट्रॅक्टरवर उभे राहून नाचताना सगळे फोटो. शिक्षक असूनही ट्रॅक्टरवर उभे राहून नाचत असेल, तर तो व्यसनी नसेल कशावरून, असा तर्क करून त्याला अडचणी.
दुसरा एक अनुभव असा : ती मुलगी तशी चांगली शिकलेली. समज असलेली. तिला मुंबईत पुरवठा निरीक्षक असलेल्या तरुणाचे स्थळ आले. तिने त्या मुलाचे फेसबुक चेक केले. त्यात तो हिरवेगार पातळ कासोटा घालून नेसलेल्या आईसोबतचा फोटो होता. मुलीला वाटले, अरे रे... असली सासू आपल्याला मोकळीक देणार नाही. तिनेच अर्थ काढला आणि नकार दिला.
ज्या तरुणाचे स्थळ आले आहे, त्याचा सामाजिक वावर कुठे आहे, त्याची लाइफ स्टाइल कशी आहे, यासंबंधीची माहिती त्याची सोशल पोस्ट पाहून लक्षात येते. पुण्या-मुंबईकडील स्थळ असेल, तर कौटुंबिक माहिती मिळवणे शक्य होत नाही. अगदीच अनोळखी तरुणाशी लग्न कसे करायचे, हा आमच्या समोरील प्रश्न आहे. -एक उपवर तरुणी, शिवाजी पेठ, कोल्हापूर.
सोशल मीडिया प्रोफाइल पाहणे हे गैर नाही; परंतु तुम्ही फक्त आवरण बघून निर्णय घेऊ नका. इमेज कॉशन्स असणाऱ्या मुलींनी त्याचे शिक्षण, आर्थिक स्थिती, वर्तन, व्यवहार, त्याचा दृष्टिकोन याचाही शोध घेतला पाहिजे. मुली एकाच व्यक्तीकडून सर्व प्रकारच्या नात्यांची अपेक्षा करू लागल्या आहेत आणि अपेक्षांचे वाढते ओझे लग्न जुळण्यास आणि झालेली लग्ने मोडण्यासही कारणीभूत ठरत आहेत. - अनुराधा मेहता, सदस्या, महिला दक्षता समिती, कोल्हापूर