Kolhapur: पंचगंगा पुलावरील उचकटल्या पट्ट्या, महामार्ग प्राधिकरणाने दुसऱ्यांदा घेतली चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:02 IST2025-09-20T18:02:04+5:302025-09-20T18:02:23+5:30
डागडुजीचे काम दिवाळीनंतर

Kolhapur: पंचगंगा पुलावरील उचकटल्या पट्ट्या, महामार्ग प्राधिकरणाने दुसऱ्यांदा घेतली चाचणी
सतीश पाटील
शिरोली : पंचगंगा पुलावरील डागडुजीचे काम दिवाळीनंतर करण्याचे आयोजन असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी शुक्रवारी दुसऱ्यांदा वाहतुकीची चाचणी घेतली. पण वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे दिवाळीनंतर काम करण्याचे ठरवले आहे.
पश्चिम बाजूस असलेल्या पंचगंगा पुलावरील पट्ट्या उचकटल्यामुळे या पुलाचे काम दिवाळीनंतर केलेले उचित राहील कारण कोल्हापूरचा शाही दसरा आणि तोंडावर असलेल्या दिवाळीमुळे महामार्गावर आणि तावडे हॉटेल चौकात वाहनांची मोठी कोंडी होणार आहे. त्यातच या कामाचा बोजा जर पडला तर वाहतुकीची बोजबारा उडेल.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली येथील पंचगंगा नदीवरील पुलाच्या पट्ट्या उचकटून बाहेर आल्याने आता या पुलाचे रॅपिड काँक्रीट करणे आवश्यक झाले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच काम करण्यासाठी दहा दिवस लागणार असून, या काळात महामार्गावरील सर्व वाहतूक पुलाच्या पूर्व बाजूला असलेल्या दुसऱ्या पुलावर वळवावी लागणार आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूककोंडी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या शिये-कसबा बावडा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातच पंचगंगा पुलावरील एक मार्ग बंद केला तर शहराकडे वळणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होणार आहे. महामार्गावरून दररोज तब्बल ५० हजारांहून अधिक वाहने कोल्हापूर मार्गे जातात.
वाहतुकीचा ताण वाढण्याचा धोका..
दसऱ्याला अंबाबाई दर्शनासाठी लाखो भाविक शहरात येतात, त्यानंतर दिवाळी खरेदीसाठी गांधीनगर बाजारपेठेत मोठी गर्दी होते, त्यामुळे महामार्गावरील दुरुस्तीचे काम या काळात हाती घेतल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठी कोंडी होऊन वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम दिवाळीनंतर करावे, असे पोलिसांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सांगितले आहे
पुलावरील पट्ट्या उचलल्या गेल्याने वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने रॅपिड काँक्रीट करून पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पण सध्या वाहतूक जास्त असल्याने पुलाचे काम दिवाळीनंतर करण्यात येणार आहे - सी.बी बर्डे, अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
कोल्हापूरचा शाही दसरा आणि तोंडावर आलेल्या दिवाळी हा सण या दोन्ही मोठ्या सणांमुळे पंचगंगा नदी पुलावर आणि तावडे हॉटेल चौकात मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यातच पंचगंगा नदी पुलावरील काम जर सुरू केले तर वाहतुकीचा बोजवारा उडेल. हे काम दिवाळीनंतर केले तर सोयीस्कर होईल - नंदकुमार मोरे, पोलिस निरीक्षक शहर वाहतूक नियंत्रण