ना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, ना अपघातप्रवणतेकडे लक्ष; कोल्हापूर-गगनबावडा रस्ता पाच ठिकाणी अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:38 IST2025-04-03T19:38:37+5:302025-04-03T19:38:56+5:30
पावसाळ्यापूर्वी काम पूर्णत्व अशक्यच

ना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, ना अपघातप्रवणतेकडे लक्ष; कोल्हापूर-गगनबावडा रस्ता पाच ठिकाणी अपूर्णच
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरणाचा दर्जा पाहिला, तर त्यास राष्ट्रीय महामार्ग म्हणताच येणार नाही. दुय्यम दर्जाचा रस्ता केला असून, अपघातप्रवण क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. कोल्हापूर ते कळे या सोळा किलो मीटरच्या या मार्गावर पाच ठिकाणी अद्याप कामे अपूर्णच असून, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर बनली आहे.
तळ कोकणाला जोडणारा आणि जवळचा मार्ग म्हणून कोल्हापूर ते गगनबावड्याला महत्त्व आहे. सरकारने या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देत त्याचे रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू केले. पहिल्या टप्यात कोल्हापूर ते कळेपर्यंत १६ किलोमीटर कामाला सुरुवात झाली. गेली दोन वर्षे हे काम सुरू आहे, पण कामाची सुरुवात झाल्यापासून त्याच्या दर्जाविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत. एकूण रस्त्याचे काम पाहिले, तर राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे काम झालेलेच नाही. या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. खुद्द करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नका, अशी भूमिका पालकमंत्र्यांच्या बैठकीत घेतली आहे.
नागरिकांच्या तक्रारीला जुमानते कोण?
रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून एकूणच कामाबाबत नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचनाही करूनही कामात बदल झालेला नाही, तिथे सामान्य नागरिकांच्या तक्रारीचे काय अशी स्थिती आहे.
येथील शेतकऱ्यांना वेगळा न्याय का?
सरकार इतर राष्ट्रीय व राज्य मार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना रेडिरेकनरच्या चौपट दर देते, मग कोल्हापूर ते गगनबावडा मार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांनाच दुप्पट दर कसा?, असा भेदभाव का?, अशी विचारणा शेतकरी करत आहेत.
फुलेवाडी नाक्याजवळील गळती सापडणार का?
खांडसरी ते फुलेवाडी नाक्यापर्यंत महापालिकेच्या पाइपलाइनमधून गळती असल्याने काम थांबले आहे. गेली दीड महिना गळती शोधण्याचे काम सुरु आहे. रिंगरोडपर्यंत खुदाई केली, तरी अद्याप गळती सापडली नसल्याने या भागात दलदलीचे साम्राज्य पाहायला मिळते.
गुणवत्तेचे तीन तेरा
कोल्हापूर ते कळे रस्त्याची निविदा १६७ कोटींची होती. पण, काम मिळवण्याच्या स्पर्धेने संबंधित ठेकेदाराने तब्बल ३६ टक्के कमी दराने अवघ्या ९० कोटींत हे काम घेतले. परिणामी कामाच्या गुणवत्तेचे तीन तेरा उडल्याचे चित्र आहे.
मोऱ्यांचे काम, शेतकऱ्यांना ताप
मोऱ्यांचे बांधकाम करताना पाण्याचा निचरा सहज होईल, हे बघितलेलेच नाही. आडूर येथे तर दोन पाइप टाकल्या आहेत, त्यातील एक पाइप मातीने भरली आहे, दुसऱ्या पाइपमधून पाणी थेट शेतकऱ्यांच्या विहिरीत जाणार आहे.
हे काम अपूर्ण राहिले..
- खांडसरी ते फुलेवाडी चौक रस्ता
- महादेव मंदिर बालिंगे ते दोनवडे रस्ता
- भोगावती नदीवरील पूल
- आडूर ते भामटे रस्ता
- कळंबे ते मरळी रस्ता
- कळे कॅटींग येथे मोरीचे काम
सरकारने भूसंपादन करताना दुजाभाव केला. इतर ठिकाणी माळरानाला रेडीरेकनरपेक्षा चौपट दर आणि पिकाऊ जमिनीला दुप्पट दर दिला आहे. हे अन्यायकारक असून, आम्हाला त्या शेतकऱ्यांप्रमाणेच पैसे मिळाले पाहिजेत. - निवृत्ती पाटील (शेतकरी, भामटे)
मोऱ्या बांधताना शेतकऱ्यांचा विचारच केलेला नाही, आडूर येथील ओढ्याचे पाणी थेट माझ्या विहिरीत घुसणार आहे. - शिवाजी चौगले (शेतकरी, आडूर)