कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनाचा इशारा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By उद्धव गोडसे | Updated: March 6, 2025 11:40 IST2025-03-06T11:39:39+5:302025-03-06T11:40:45+5:30
कोरटकर धमकी प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निदर्शने होऊ नयेत यासाठी खबरदारी

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनाचा इशारा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान निदर्शने करण्याचा इशारा दिलेल्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी आज सकाळपासून धरपकड सुरू केली. कार्यकर्त्यांनी निदर्शने करू नयेत अशा नोटिसा पोलिसांनी बुधवारी रात्री कार्यकर्त्यांना मोबाईलवर पाठवल्या आहेत. दहा ते बारा कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयात नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. तरीही इंडिया आघाडी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निदर्शने करण्यावर ठाम आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी वेळेत अटक केली नाही. या गुन्ह्याचा तपास संथ गतीने सुरू आहे. कोरटकर हा भाजपमधील काही नेत्यांच्या जवळचा असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान निदर्शने करण्याचा इशारा इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला होता.
निदर्शने करू नयेत अशा सूचना पोलिसांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. तरीही कार्यकर्ते निदर्शने करण्यावर ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी रात्री काही कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या. तसेच गुरुवारी सकाळीच त्यांना ताब्यात घेतले. हर्षल सुर्वे, वसंतराव मुळीक, प्रवीण पाटील, शुभम शिरहट्टी, आदींचा यात समावेश आहे.