Kolhapur: महादेवी हत्तीण परत येण्याचा मार्ग सुकर झाला, पेटाचा युक्तिवाद न्यायमूर्तींनी खोडून काढला; १४ ऑक्टोबरला फैसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:13 IST2025-09-26T12:13:44+5:302025-09-26T12:13:59+5:30
महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी मठ व वनतारा यांनी संयुक्तरित्या प्रस्ताव दाखल करावा

संग्रहित छाया
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाकडील महादेवी हत्तीण परत येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हत्तीण परत आणण्यासाठी मठ व वनतारा यांनी संयुक्तरित्या प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश गुरुवारी उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष दीपक शर्मा यांनी ऑनलाईन सुनावणीद्वारे दिले.
प्रस्तावावर १४ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या प्रस्तावासाठी एक आठवड्याची मुदत मठाने मागितली आहे. हा आदेश देत असतानाच पेटाचा युक्तिवाद न्यायमूर्तींनी खोडून काढला असून, महादेवीची जागा तांत्रिक हत्ती घेऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले असल्याची माहिती सागर शंभूशेटे यांनी पत्रकारांना दिली.
महादेवी हत्तीण परत मिळण्यासाठी नांदणी मठ, वनतारा व राज्य शासनाच्यावतीने उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार मठाकडे हत्तीण हस्तांतरण अर्जावर उच्चस्तरीय समितीने गुरुवारी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन सुनावणी निश्चित घेतली. त्यानुसार ॲड. मनोज पाटील, ॲड.बोरुलकर, ॲड. लांडगे यांनी समितीचे अध्यक्ष वर्मा यांच्याकडे बाजू मांडली.
महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी मठ व वनतारा यांनी संयुक्तरित्या प्रस्ताव दाखल करावा, असे सांगितले. त्यावर मठाने एक आठवड्याची मुदत मागितली आहे. १४ ऑक्टोबरला या प्रस्तावावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, समितीच्या अध्यक्षांनी पेटाचा युक्तिवाद देखील खोडून काढला. महादेवीची जागा तांत्रिक हत्ती घेऊ शकत नसल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.