कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे 'या' दिवशी बंद राहणार दर्शन, खजिन्यात किती कोटींची पडली भर.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:34 IST2025-09-12T13:32:47+5:302025-09-12T13:34:29+5:30
शारदीय नवरात्रोत्सवाला दहा दिवस राहिल्याने आता मंदिर परिसरातील कामांना वेग

कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे 'या' दिवशी बंद राहणार दर्शन, खजिन्यात किती कोटींची पडली भर.. जाणून घ्या
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात झाली. मुंबईच्या आय स्मार्ट फॉसेटिक कंपनीच्या वतीने दरवर्षी ही सेवा मोफत दिली जाते. कंपनीचे २५ कमर्चारी अत्याधुनिक मशीनरींसह पुढील आठ दिवस हे काम करणार आहेत, तर बुधवारी (दि. १७) देवीचा गाभारा स्वच्छ केला जाणार असून, यादिवशी मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहील.
शारदीय नवरात्रोत्सवाला दहा दिवस राहिल्याने आता मंदिर परिसरातील कामांना वेग आला असून, गुरुवापासून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला. मुंबईतील आय स्मार्ट कंपनीच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून ही सेवा मोफत दिली जाते. गुरुवारी सकाळी या २५ जणांच्या टीमचे कोल्हापुरात आगमन झाले. अंबाबाई मंदिरात सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेच्या मशीनरींचे पूजन झाले. त्यानंतर मूळ स्वच्छतेला प्रारंभ झाला.
मंदिराची वास्तू हेमाडपंती दगडी बांधकामाने बनली असून, हेरिटेज वास्तूंच्या यादीत समावेश आहे. त्यामुळे स्वच्छेसाठी कोणत्याही पद्धतीच्या केमिकलचा वापर केला जात नाही. फक्त पाण्याचा फवारा मारून हे काम केले जाते. बुधवारी (दि. १७) एकादशी असून, त्यादिवशी अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. यादिवशी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद असेल.
अंबाबाईच्या खजिन्यात दीड कोटींची भर
गेल्या चार दिवसांपासून अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमधील सुरू असलेल्या रकमेची मोजदाद गुरुवारी पूर्ण झाली. मागील दीड महिन्यात अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नात १ कोटी ५६ लाख ८४ हजार ५३३ रुपयांची भर पडली आहे. सर्वाधिक ४४ लाख ६८ हजार रुपये इतकी रक्कम २ नंबरच्या पेटीमध्ये नोंद झाली आहे.