सरदार चौगुलेपोर्ल तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यात शैक्षणिक उठाव होऊन उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्या, परंतु नोकरीची शाश्वती कमी असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. दुर्गम असणाऱ्या तालुक्यातील तांत्रिक शिक्षण देणाऱ्या आयटीआयसारख्या शिक्षण प्रणालीच्या शाळांची संख्या वाढवणे शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा नाविन्यपूर्ण शिक्षणावर भर देऊन इंग्रजी खासगी शाळांशी स्पर्धा करत असल्या तरी पटसंख्येत फारसा बदल होताना दिसत नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देणे काळाची गरज आहे.पन्हाळगडासारख्या हिल स्टेशनचा उपयोग करून तालुक्यात औषधशास्त्र महाविद्यालय, अभियांत्रिकी, काॅन्व्हेंटसारख्या शाळांची संख्या वाढल्याने शैक्षणिक विकास झाला, परंतु माध्यमिक शिक्षणापर्यंत असणारी विद्यार्थ्यांची संख्या उच्चस्तरीय शिक्षण प्रणालीत दिसून येत नसल्याने माध्यमिक शिक्षणानंतर ही मुले काय करतात? असा प्रश्न पन्हाळा तालुक्याच्या शैक्षणिक परिघात उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील मुलांना उच्चशिक्षण गावाशेजारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तालुक्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची ७ महाविद्यालये आहेत. महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आणि खासगीत नोकरी, स्पर्धा परीक्षा क्लासेस किंवा ॲकॅडमीत प्रवेश घेऊन परीक्षेपुरत्या असणारी उपस्थिती शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने गंभीर आहे.तालुक्यात काॅन्व्हेंटच्या शाळांचे प्रमाण वाढत असल्याने काही जिल्हा परिषद आणि खासगी माध्यमिक शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करून वेळेत केलेला बदल फायद्याचा ठरला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर पारदर्शक परीक्षा घेतल्या, तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करता येईल. शासनाच्या धोरणाला अनुसरून शिक्षण परिघात आणि पालकांच्या मागणीप्रमाणे शाळांनी बदल केले, तर जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळा इतर शाळांना भारी पडू शकतील.
कृतीयुक्त अध्ययन गरजेचेमुलांत मूलभूत क्षमता विकसित झाल्या पाहिजे. वाचन, संभाषण, गणनक्रिया यामध्ये मुले तरबेज असणे गरजेचे आहे. पाठांतरापेक्षा आकलन (समजणे) क्षमतेला महत्त्व दिले पाहिजे. कृतीयुक्त अध्ययनाला पूरक वातावरण वर्गात असणे शिक्षणाच्या दृष्टीने गरजेचे आहे. गट अध्ययन, कृतीयुक्त शिक्षण, विषयमित्र पद्धत यांसारख्या शिक्षण पद्धतीचा अध्ययन प्रक्रियेत वापर केला, तरच अध्ययन प्रकिया अधिक प्रभावी होईल आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीला चालना मिळेल.
- सर्वच महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या ८,७०९
- अभियांत्रिकी महाविद्यालय २
- वरिष्ठ महाविद्यालय ७
- नर्सिंग महाविद्यालय २
- डाॅक्टर ॲाफ फार्मासिस्ट महाविद्यालय २
- बी.फार्मसी २
- डी.फार्मसी ४
- एम.फार्मसी २
- खाजगी आयटीआय ७
- सरकारी आयटीआय १
- पहिली ते बारावीपर्यंतची पटसंख्या ४४,८०८
- प्राथमिक शाळेतील मंजूर शिक्षक ७७१
- कार्यरत शिक्षक पदे ६९८
- रिक्त पदे ७३
- तालुक्यातील प्राथमिक-माध्यमिक शाळांची एकूण संख्या ३२०
- जिल्हा परिषद शाळा १९३
- खासगी माध्यामिक शाळा ७५
- खासगी स्वयंअर्थसाहाय्य/ विनाअनुदानित शाळा ४६
- समाजकल्याण शाळा ०४
- विशेष गतीमंद शाळा ०२
शासनाने प्रवेश प्रक्रिया राबवताना सर्वच अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया एकाचवेळी राबविणे गरजेची आहे. वेगवेगळ्या वेळी प्रवेश प्रक्रिया राबविल्यामुळे विद्यार्थी मधेच कॉलेज सोडून कोर्सेसची अदलाबदल करतात. त्याचा फटका महाविद्यालयांना बसतो, शिवाय गुणवंत विद्यार्थी या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकत नसल्याने संशोधनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. या अभ्यासक्रमानंतर देशविदेशात चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संध्या उपलब्ध होत आहेत. -डॉ. एस. मजाप्पा, प्राचार्य, वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसी, कोडोली