भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्ह्यातील नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाची मुदत यंदा संपली तरी काम पूर्ण होणार नसल्याने पुन्हा एक वर्षाची म्हणजे २०२६ पर्यंत ठेकेदार कंपनीस मुदतवाढ मिळाली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने मूळ रस्ता अनेक ठिकाणी खोदला आहे. भरावा टाकला आहे. परिणामी अपघातांमुळे वाहनधारकांसाठी रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे. आणखी एक वर्ष अशीच स्थिती राहणार आहे. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूचे रहिवासी, वाहनधारकांचा श्वास धुळीने कोंडत आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील चिखलातून सर्कस करीत वाहने चालवावी लागणार आहेत.नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ या १३४ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सन २०२३ पासून केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते आंब्यापर्यंत पूर्वी असलेल्या रस्त्यावरील सर्व तीव्र वळणे, चढ-उतार काढले आहेत. मलकापूर, शाहूवाडीसह अनेक गावांना बायपास करून रस्ता होत आहे. शक्य तितका रस्ता सरळ केला आहे. यामुळे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील लहान-मोठे डोंगर फोडले जात आहेत. नवीन रस्त्यावर भरावा, बांधकाम, उड्डाण पूल बांधणे अशी कामे केली जात आहेत.
पन्हाळा, शाहूवाडीत पावसाळ्यात प्रचंड पाऊस असल्याने काम करण्यास त्याचा व्यत्यय येत आहे. कामाला गती देता आलेली नाही. काम केले जात असतानाही अनेक ठिकाणी पूर्वीच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. हा रस्ता नांगरलेल्या शेतासारखा आहे. काही ठिकाणी नवीन काँक्रीटचा रस्ता तयार झाला आहे. वाहनधारकांना काँक्रीटच्या आणि खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत.काँक्रीटच्या रस्त्यावर कारसारखी हलकी वाहने आल्यानंतर ती शंभरच्या गतीने जातात. अवजड वाहने ८० च्या स्पीडने जातात. काही अंतरानंतर पुन्हा खराब, माती टाकून केलेला रस्ता लागतो. यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान, गतीने काम झाले असते तर या वर्षीच वाहनधारकांची यातून सुटका झाली असती; पण काम अपेक्षित गतीने न झाल्याने पुढील एक वर्ष तरी या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे.दृष्टिक्षेपातील महामार्ग..
- रत्नागिरी ते चोकाक : १३४.०६९ किलोमीटर
- पहिला टप्पा मिऱ्या बंदर ते आंबा : ५५.९०९ कि.मी.
- दुसरा टप्पा आंबा ते पैजारवाडी : ४५.२०० कि. मी.
- तिसरा टप्पा पैजारवाडी ते चोकाक : ३२.९६० कि. मी.
- रुंदी : ४५ मीटर
- मंजूर निधी : ५६९८.६४ कोटी
- कोल्हापूर - आंबा : ३९२४.६१ कोटींची तरतूद
- जिल्ह्यातील बाधित गावे : ४९
- जमीन संपादित झालेले शेतकरी : १२ हजार ६०८
- जमीन मोबदल्यासाठी तरतूद : १ हजार २५ कोटी
कोल्हापूर शहराला बायपास; पण..सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग अंकली चोकाक - हेर्ले, शिये- भुये- केर्लेे असा येतो. कोल्हापूर शहरातून हा रस्ता बायपास झाला आहे. शियेजवळ पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गातून क्रॉसिंग होणार आहे. शियेपासून केर्लेपर्यंतच्या कामाला गती नाही. पिकाऊ काळ्या जमिनीतून हा रस्ता जात आहे. हा रस्ता लवकर पूर्ण होत नसल्याने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
भूसंपादनास विरोधामुळे कामाचा श्रीगणेशाच नाही ..महामार्गासाठी ९०७ किलोमीटरचे भूसंपादन बाजारभावाच्या चारपट मूल्यांकनाने झाल्याने शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला नाही; पण चोकाक ते अंकलीपर्यंतच्या ३८ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यासाठीच्या जमिनीला रेडीरेकनरच्या दुप्पट भाव मिळणार असल्याने बाधित शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. बाधित शेतकऱ्यांनी संघटितपणे जमीन संपादनाची प्रक्रिया हाणून पाडली आहे. जमीन संपादित झाली नसल्याने महामार्गाच्या कामाचा अजून श्रीगणेशाही झालेला नाही.
मिऱ्या बंदर ते चोकाकपर्यंत तीन टप्प्यांत काम होत आहे. मिऱ्या बंदर ते आंबापर्यंतचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. तेथून पुढील काम जमीन संपादनासह अनेक अडचणींमुळे ५० टक्केच झाले आहे. काम पूर्ण करण्यास एक वर्षाची मुदवाढ मिळाली आहे. - गोविंद, प्रकल्प उपव्यवस्थापक, नागपूर - रत्नागिरी महामार्ग, कोल्हापूर