Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत ३३-३३-१५ चे समीकरण, शिंदेसेनेच्या आज मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:28 IST2025-12-20T15:27:39+5:302025-12-20T15:28:32+5:30
भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादीकडून उपसमित्यांची स्थापना

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत ३३-३३-१५ चे समीकरण, शिंदेसेनेच्या आज मुलाखती
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी निश्चितीला शुक्रवारी गती आली आहे. येथील एका विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत शिंदेसेना ३३, भाजप ३३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १५ अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. याच बैठकीत तीनही पक्षांकडून तीन उपसमित्यांची स्थापना करण्यात आली असून, यापुढची चर्चा या उपसमित्यांमध्ये होऊन अंतिम निर्णयासाठी नेत्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या बैठकीला तपशील संध्याकाळीच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर करण्यात आला आहे.
या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जयंत पाटील उपस्थित होते. शिंदेसेनेच्या उपसमितीमध्ये युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित ऊर्फ नाना कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, तर भाजपच्या वतीने आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील व प्रमुख पदाधिकारी उपसमितीमध्ये असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आदिल फरास, महेश सांवत, संदीप कवाळे यांचा उपसमितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीनही उपसमित्यांची आज शनिवारी बैठक होणार आहे.
उपसमिती करणार चाचपणी
कोणत्या प्रभागात निवडून येण्याची क्षमता नेमकी कोणाकडे आहे, याची ही उपसमिती चाचपणी करणार आहे. त्यानुसार किती जागांवर कोण लढणार, याची प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. प्रमुख नेत्यांशी चर्चा करताना अधिकाधिक जागांचा गुंता सोडवूनच समोर जायचे, यासाठी या उपसमित्या नेमण्यात आल्या आहेत.
भाजपमध्ये एकमतासाठी प्रयत्न
भाजपच्या माध्यमातून ताराराणी आघाडीचे काही माजी नगरसेवकही इच्छुक असल्याने भाजपमध्येच एकमत करण्यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते. त्यामुळे प्रा. जयंत पाटील हे खासदार धनंजय महाडिक यांच्याशी मोबाइलवरून संपर्कात होते. तर आमदार अमल महाडिक यांच्याशी ते प्रत्यक्ष चर्चा करत होते.
चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यालयात घेतला आढावा
मिरजेहून दुपारी साडेतीननंतर मंत्री चंद्रकांत पाटील हे मकरंद देशपांडे यांच्यासह नागाळा पार्कातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात आले. या ठिकाणी त्यांनी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. यावेळी पाटील यांनी एकूणच निवडणुकीच्या रणनीतीबाबत निवड पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांशी चर्चा केली.
शिंदेसेनेच्या आज मुलाखती
शिंदेसेनेच्या संपर्क कार्यालयातून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत १९६ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. प्रभाग क्रमांक १ मधून तृतीयपंथी इच्छुकानेही अर्ज नेला आहे. तर शुक्रवारअखेर १२५ अर्ज जमा करण्यात आले आहेत. सर्वाधिक अर्ज हे प्रभाग क्रमांक १६ मधून, तर सर्वांत कमी प्रभाग क्रमांक २ मधून नेण्यात आले आहेत. या सर्वांच्या मुलाखती खानविलकर पेट्रोलपंपाजवळील संपर्क कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्रभाग क्रमांक १ ते १० च्या, तर दुपारी २ नंतर प्रभाग क्रमांक ११ ते २० च्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.