Kolhapur Politics: महायुतीचे किती ताणणार, त्यावर आघाडीचे फावणार; सत्तेसाठी मित्रपक्षांची गोळाबेरीज महत्त्वाची

By समीर देशपांडे | Updated: July 9, 2025 16:57 IST2025-07-09T16:54:29+5:302025-07-09T16:57:44+5:30

कागदावर महायुती भक्कम, सतेज पाटील निवडक जागांवर लक्ष केंद्रित करणार

The Maha Vikas Aghadi will decide how much heat the Mahayuti will take in the Kolhapur Zilla Parishad elections | Kolhapur Politics: महायुतीचे किती ताणणार, त्यावर आघाडीचे फावणार; सत्तेसाठी मित्रपक्षांची गोळाबेरीज महत्त्वाची

Kolhapur Politics: महायुतीचे किती ताणणार, त्यावर आघाडीचे फावणार; सत्तेसाठी मित्रपक्षांची गोळाबेरीज महत्त्वाची

समीर देशपांडे 

कोल्हापूर : जरी राज्यात महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी, शिंदेसेना आणि जनसुराज्य एकत्र असले तरी जिल्हा परिषदेच्या रणांगणात काही तालुक्यांमध्ये यातीलच काही नेते एकमेकांच्याविरोधात शड्डू ठोकून उभे राहणार आहेत. त्यामुळे महायुतीचे किती फाटणार आहे तेवढे महाविकास आघाडीचे फावणार आहे. परंतु ‘निवडणुकीआधी लढाईनंतर पदासाठी एकत्रित चढाई’ हे सूत्र गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील नेत्यांना अंगवळणी पडले आहे. अशा वातावरणात महाविकास आघाडीला मित्रपक्षांची गोळाबेरीज अधिक ताकतीने करावी लागणार आहे.

प्रत्येक पक्षाची आणि नेत्याची बलस्थाने ठरलेली आहेत. गेल्या निवडणुकीचा विचार करता हातकणंगलेमध्ये भाजपने निम्म्या जागा जिंकल्या होत्या. करवीर, शिरोळ आणि गडहिंग्लजनेही भाजपला साथ दिली. करवीरमध्ये काँग्रेस वरचढ राहिली. गगनबावड्यात काँग्रेसने १०० टक्के यश मिळवले तर चंदगड, राधानगरीनेही त्यांना मदत केली. राष्ट्रवादीचे सर्वाधिक तीन सदस्य कागल तालुक्यातून तर राधानगरीतून दोन सदस्य निवडून आले. ११ पैकी ७ जागा हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांच्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात वाढलेल्या जागा हाही मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे.

वाचा- कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी

प्रकाश आबिटकर, संजय घाटगे, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील यांच्या मतदारसंघातून शिवसेनेला चांगले यश मिळाले. यातून आता सत्यजित पाटील हे उद्धवसेनेकडे आहेत. तर संजयबाबांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पन्हाळा, हातकणंगले आणि शाहूवाडी अशा तीन तालुक्यांतून ६ जागा मिळवत जनसुराज्यने आपला प्रभाव ठेवला होता. महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, प्रकाश आबिटकर यांची शाहू आघाडी यांनी सात जागा मिळवल्या होत्या. स्वाभिमानीने दोन आणि कुपकेरांच्या आघाडीने दोन जागा पटकावल्या होत्या. 

कागदावर महायुती भक्कम

राज्याच्या राजकारणात एकत्र असलेली महायुती कागदावर भक्कम आहे. तीन पैकी दोन खासदार आणि निवडून आलेल्या १० पैकी १० आमदार महायुतीचे आहेत. परंतु परस्परविरोधी गट एकत्र आल्याने त्या त्या तालुक्यात सर्वांच्यातच समझोता होणे अशक्य आहे. कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण पण शत्रू समजून लढाया होणार आहेत. महायुतीतील दोघांच्या भांडणाचा लाभ ‘महाविकास’ किती उठवू शकते यावर अनेक गणिते अवलंबून आहेत.

सतेज पाटील निवडक जागांवर लक्ष केंद्रित करणार

सतेज पाटील हे सध्या महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत. त्यांनी लोकसभेनंतर विधानसभेच्या निकालाच्या झटक्यानंतरही उद्धवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, भाकप, माकप या सर्वांना एकत्रित ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडक जागांवर लक्ष केंद्रित करून बाजी मारण्याची पाटील यांची रणनीती आहे. सगळीकडे ताकद लावून चालणार नाही, याची त्यांनाही जाणीव आहे.

तीन मंत्री, कोरेंवर जबाबदारी

जिल्हा परिषदेची महायुतीची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्यावर देण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील.

तालुका - गट आणि गण

  • करवीर - १२/२४
  • हातकणंगले - ११/२२
  • शिरोळ - ७/१४
  • पन्हाळा - ६/१२
  • कागल - ६/१२
  • राधानगरी - ५/१०
  • गडहिंग्लज - ५/१०
  • चंदगड - ४/८
  • भुदरगड - ४/८
  • शाहूवाडी - ४/८
  • आजरा - २/४
  • गगनबावडा - २/४
  • एकूण - ६८/१३६

Web Title: The Maha Vikas Aghadi will decide how much heat the Mahayuti will take in the Kolhapur Zilla Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.