कोल्हापूर सर्किट बेंचचे रविवारी शानदार उद्घाटन; सरन्यायाधीश गवई उद्घाटक, न्यायमूर्ती कर्णिक, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:56 IST2025-08-11T11:56:24+5:302025-08-11T11:56:42+5:30
पाच हजार खुर्च्यांची बैठक व्यवस्था, जिल्हा बार असोसिएशनची माहिती

कोल्हापूर सर्किट बेंचचे रविवारी शानदार उद्घाटन; सरन्यायाधीश गवई उद्घाटक, न्यायमूर्ती कर्णिक, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री येणार
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन रविवारी (दि. १७) दुपारी साडेतीन वाजता नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती मकरंद कर्णिक समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, सहा जिल्ह्यांतील सर्व लोकप्रतिनिधी, वकील आणि पक्षकार यांच्यासाठी पाच हजार खुर्च्यांची बैठक व्यवस्था करीत असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या ४२ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्किट बेंचला अखेर मूर्त रूप मिळाले आहे. याच्या उद्घाटन समारंभाची कार्यक्रम पत्रिका मुंबई उच्च न्यायालयाने निश्चित केली. जिल्हा बार असोसिएशनने जिल्हा न्याय संकुलात पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. असोसिएशनचे अध्यक्ष पाटील म्हणाले, सर्किट बेंचच्या कामकाजाला सोमवारी (दि. १८) सकाळी अकरापासून सुरुवात होईल. तत्पूर्वी, रविवारी दुपारी साडेतीन वाजता सीपीआरसमोरील इमारतीमध्ये फीत कापून उद्घाटन होईल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर साडेतीन वाजता मेरी वेदर ग्राऊंडवर उद्घाटनाचा पुढील समारंभ होईल.
कोल्हापूर सर्किट बेंचकडे ५० ते ६० हजार खटले वर्ग; कागदपत्रांचे गठ्ठे बांधून तयार, किती वकील काम करणार.. वाचा
याच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती मकरंद कर्णिक असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे प्रमुख उपस्थित असतील. पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना प्रमुख पाहणे म्हणून निमंत्रित केले आहे.
याशिवाय सहा जिल्ह्यांतील सर्व मंत्री, आमदार, खासदार, सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, सेवानिवृत्त न्यायाधीश, विधि महाविद्यालयांचे विद्यार्थी, खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी, खंडपीठ लढ्यातील सर्व संस्था, संघटना, तालीम संस्था, पक्षकार उपस्थित राहणार आहेत. सर्किट बेंचचे उद्घाटन हा कोल्हापूरच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण असल्याने नागरिकांनीही या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी केले आहे. पत्रकार परिषदेसाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष तुकाराम पाडेकर, सचिव मनोज पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
गवईंसह चौघांचे सत्कार
सर्किट बेंचला मंजुरी देण्यात महत्त्वाची भूमिका असलेले सरन्यायाधीश गवई यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांचा बार असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार केला जाणार आहे. राजर्षी शाहू महाराजांचा छोटा पुतळा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कारमूर्तींचे विशेष आभार मानले जातील, अशी माहिती ॲड. पाटील यांनी दिली.
भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन
मुंबई उच्च न्यायालय, राज्याचा विधि व न्याय विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्किट बेंच उद्घाटन समारंभाचे आयोजन केले जात आहे. हा समारंभ शानदार आणि भव्यदिव्य व्हावा असा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणांकडून सुरू आहे. सर्वांच्या प्रयत्नातून हा सोहळा संस्मरणीय होईल, असा विश्वास बार असोसिएशनने व्यक्त केला.