कोल्हापुरातील 'आयटी पार्क'चे घोंगडे आणखी भिजत पडण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:27 IST2025-11-11T18:27:31+5:302025-11-11T18:27:51+5:30
उपमुख्यमंत्र्यांचे दोन वर्षांपूर्वी आदेश

कोल्हापुरातील 'आयटी पार्क'चे घोंगडे आणखी भिजत पडण्याची चिन्हे
कोल्हापूर : शेंडा पार्कातील कृषी विभागाच्या ३० हेक्टर जागेत आयटी पार्क होणार, त्याबदल्यात कृषी विभागाला सांगरुळची वनविभागाची जागा देणार अशा घोषणा होऊन त्यावर प्रक्रियाही सुरू झाल्याचा दावा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केला खरा. मात्र, सांगरुळची जागाच महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पसंत नसून तसा अहवालच विद्यापीठाच्या समितीने दिला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेले आयटी पार्कचे घोंगडे आणखी भिजत पडणार आहे.
शेंडा पार्कमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटी पार्कसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बदल्यात विद्यापीठाला त्यांच्या प्रकल्पांसाठी शहराच्या बाहेर ५० हेक्टर पर्यायी जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सांगरुळ (ता.करवीर) येथील ५० हेक्टर जागा कृषी विद्यापीठाला दाखवली. ही जागा वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने ‘डी फॉरेस्ट’ करूनच ती कृषी विद्यापीठाला देण्यात येणार होती.
मात्र, कृषी विद्यापीठाला ही जागा आपल्यासाठी उपयोगी येईल का, याचीच साशंकता होती. त्यामुळे त्यांनी या जागेला लगेच होकार न देता समिती नेमून जागेची पाहणी केली आहे. या पाहणीत ही जागा सोयीसुविधांयुक्त नसल्याचे दिसून आल्याने समितीने तसा अहवाल विद्यापीठाला पाठवला आहे. त्यामुळे जोपर्यंत कृषी विद्यापीठाला त्यांच्या मनासारखी जागा मिळणार नाही तोपर्यंत त्या जागेचा ताबा ते सोडणार नाहीत. परिणामी, आयटी पार्कची प्रक्रिया आणखी रखडण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे दोन वर्षांपूर्वी आदेश
शेंडा पार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरालगतची ५० हेक्टर जागा द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये दिले होते. त्यानंतर दोन वर्षे उलटून गेली तरी ही जागा अद्यापही जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आलेली नाही.
विद्यापीठाच्या समितीने सांगरुळच्या जागेची पाहणी करून त्याचा अहवाल विद्यापीठाला पाठवला आहे. - सुनील कराड, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर.