‘पाटबंधारे'ने पाणी तोडले... मनपाने सीलच ठोकले; कोल्हापुरात थकबाकीवरून सरकारी कार्यालयांत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:57 IST2026-03-21T11:54:18+5:302026-03-21T11:57:21+5:30

नगरसेवकांचा वाद कमी तोपर्यंत सरकारी कार्यालयांत जुंपली

the Irrigation Department cut off water supply, the Municipal Corporation locked the offices due to arrears In Kolhapur | ‘पाटबंधारे'ने पाणी तोडले... मनपाने सीलच ठोकले; कोल्हापुरात थकबाकीवरून सरकारी कार्यालयांत जुंपली

‘पाटबंधारे'ने पाणी तोडले... मनपाने सीलच ठोकले; कोल्हापुरात थकबाकीवरून सरकारी कार्यालयांत जुंपली

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांत पंचगंगा नदीतून उचलेल्या पाण्याच्या बिलापोटीची थकबाकी भरली नाही म्हणून जलसंपदा विभागाने शुक्रवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा, नागदेववाडी येथील उपसा पंप सील केले. परिणामी दुपारनंतर शहराच्या बहुतांश पाणीपुरवठा खंडित झाला.

या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आक्रमक झालेल्या महापालिका घरफाळा विभाग, तसेच पाणीपुरवठा विभागाने थकबाकी भरली नाही म्हणून सिंचन भवन परिसरातील जलसंपदा विभागाची सर्व १७ कार्यालये सील केली. पाच नळकनेक्शन तोडली. त्यामुळे दिवसभर महापालिका आणि जलसंपदा विभागात त्याचे तीव्र पडसाद उमटले.

दुपारी महापालिकेत झालेल्या बैठकीतूनच महापौर रूपाराणी निकम यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तसेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘पीए’शी बोलून झालेल्या सगळा घटनाक्रम आणि शहराचा पाणीपुरवठा खंडित झाल्याचे सांगितले. सायंकाळी मंत्री पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्याशी बोलून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या वादावर पडदा पडला.

वारंवार सूचना नोटीस देऊनही महापालिकेने १६५ कोटींची थकबाकी न भरल्याने आणि ही थकबाकी भरण्याबाबत कोणतीही ग्वाही न दिल्यामुळे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता माने यांनी सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर जाऊन नागदेववाडी व बालिंगा येथे जाऊन पाणीपुरवठा बंद केला. याची माहिती कळताच अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी तेथे जाऊन माने यांच्याशी चर्चा करताना पाणीपुरवठा बंद करू नका, अशी विनंती केली; पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही.

महापालिका प्रशासनही आक्रमक; १७ कार्यालयांना ठोकले कुलूप

पाणीपुरवठा खंडित केल्याने आक्रमक झालेल्या महापालिका प्रशासनानेही जलसंपदा विभागावर कारवाई सुरू केली. घरफाळ्याची, तसेच पाणीपट्टीची थकीत रक्कम भरली नाही म्हणून सिंचन भवनातील जलसंपदा विभागाची १७ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून, लाइट बंद करून ती सील केली. त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला. या कारवाईच्या वेळी चारही विभागीय कार्यालयांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुलुपे कमी पडली

जलसंपदा विभागाची कार्यालये सील करण्यास तीन-चार कुलुपे घेऊन गेल्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुलपे कमी पडली. तथे सतरा कार्यालये आहेत. त्यामुळे नंतर आणखी कुलुपे आणावी लागली.

पाणीपुरवठा सुरू करा; मंत्री पाटील यांच्या सूचना

दुपारी साडेतीन वाजता महापौर रूपाराणी निकम यांनी कार्यकारी अभियंता माने यांना आपल्या कार्यालयात बोलवून घेतले आणि थकबाकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. सणवार असताना थकबाकी वसुलीसाठी जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे होता. मीडियाला सोबत घेऊन जात केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीतून महापौर निकम यांनी मंत्री चंदक्रांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली. मंत्री पाटील यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना माने यांना दिल्या.

नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

महापौर निकम यांच्यासह स्थायी सभापती विशाल शिराळे, गटनेते मुरलीधर जाधव, आदिल फरास यांनी बैठकीत जलसंपदा विभागाच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. थकबाकीसाठी पाणीपुरवठा खंडित करण्याची आवश्यकता नव्हती, अशा शब्दांत फरास यांनी संताप व्यक्त केला. महापौर निकम यांनी थकबाकीचा वाद होता तर तो चर्चेतून संपविता आला असता, असे सांगत निषेध व्यक्त केला.

Web Title : पानी कटौती से विवाद: कोल्हापुर में बकाया राशि पर विभागों में झगड़ा

Web Summary : कोल्हापुर में सिंचाई विभाग द्वारा पानी के बिलों का भुगतान न करने पर आपूर्ति पंपों को सील करने के बाद पानी की समस्या उत्पन्न हो गई। जवाबी कार्रवाई में, नगरपालिका ने बकाया करों के लिए 17 सिंचाई कार्यालयों को सील कर दिया, जिससे विवाद बढ़ गया। मंत्रियों के हस्तक्षेप से पानी की आपूर्ति बहाल हुई, जिससे तत्काल संकट टल गया।

Web Title : Water Cut Sparks Clash: Kolhapur Departments Fight Over Unpaid Dues

Web Summary : Kolhapur faced water disruption after irrigation dept. sealed supply pumps over unpaid bills. In retaliation, the municipality sealed 17 irrigation offices for outstanding taxes, escalating the conflict. Intervention from ministers led to restoring water supply, resolving the immediate crisis.