Kolhapur News: मंत्र्यांच्या शब्दानंतर 'महसूल'चे आंदोलन स्थगित, आजपासून काम पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:03 IST2025-12-19T12:02:45+5:302025-12-19T12:03:09+5:30
गेली तीन दिवस सुरू होते आंदोलन

Kolhapur News: मंत्र्यांच्या शब्दानंतर 'महसूल'चे आंदोलन स्थगित, आजपासून काम पूर्ववत
कोल्हापूर : पुण्यातील महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणे, गौणखनिज अनधिकृत वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवीन प्रणाली विकसित करणे, वेतन वाढीचा विशेष प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून घेणे यासह संघटनेच्या विविध मागण्यांवर महसूलमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी शब्द दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले पुणे विभागातील महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले बेमुदत काम बंद आंदाेलन गुरुवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी समन्वय महासंघाने याबाबतचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले. आज, शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुक्यांतील महसूल कार्यालये पुन्हा गजबजणार आहे.
पुण्यात महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करत मंगळवारपासून पुणे विभागातील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यात कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासह अप्पर जिल्हाधिकारी, १२ उपजिल्हाधिकारी, २० तहसीलदार, २१९ महसूल सहायक, १४३ अव्वल कारकून, २२ चालक, ८० शिपाई, ८१ मंडळ अधिकारी, ४९८ तलाठी ३६८ कोतवाल असे महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदविला. त्यामुळे गेली तीन दिवस सात बारा उतारे, फेरफार, विविध प्रकारचे दाखले, जमिनीसंंबंधित दावे, हरकती, सुनावण्या, प्रस्ताव, विविध प्रकरणांच्या फायली, त्यावरील निर्णय असे सर्व कामकाज ठप्प झाले होते.
आंदोलनाची दखल घेत महसूलमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासह नायब तहसिलदार, सहायक महसूल अधिकारी, महसूल साहायक ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, यांचे वेतन श्रेणी वाढीबाबत विशेष प्रस्ताव मंजूर करणे, सुधारीत आकृतिबंध तत्काळ मंजूर करणे या मागण्यांवर आश्वासन दिले.
तसेच महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली चुकीचे काम करू नये, चुकीच्या कामासाठी कोणी आग्रह धरत त्रास देत असल्यास निदर्शनास आणून द्यावे, असे सांगितले. मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व प्रलंबित मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनांच्या अनुषंगाने संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत महसूल महासंघाने पुकारलेले कामबंद आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.