शाळांना गळती, अकॅडमीमध्ये भरती; कोल्हापूर जिल्ह्यात १११ हून अधिक अकॅडमी, शाळांवर परिणाम

By समीर देशपांडे | Updated: August 5, 2025 12:49 IST2025-08-05T12:49:22+5:302025-08-05T12:49:43+5:30

आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ शाळांची तपासणी

The increasing attraction of parents towards the academy has affected the schools of the Zilla Parishad and the secondary schools of educational institutions in kolhapur | शाळांना गळती, अकॅडमीमध्ये भरती; कोल्हापूर जिल्ह्यात १११ हून अधिक अकॅडमी, शाळांवर परिणाम

शाळांना गळती, अकॅडमीमध्ये भरती; कोल्हापूर जिल्ह्यात १११ हून अधिक अकॅडमी, शाळांवर परिणाम

समीर देशपांडे 

कोल्हापूर : एकीकडे प्राथमिक आणि माध्यमिक शासनमान्य शाळांमधील शिक्षकांना उत्तम वेतन दिले जात असताना दुसरीकडे पालकांचा ओढा मात्र अकॅडमीकडे वाढत असल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात अंदाजे १११ हून अधिक अकॅडमी सुरू असून, याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांवर आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांवरही होत आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये अकॅडमीचे प्रस्थ वाढत असल्याचे दिसून येत आहे. याआधीची परिस्थिती नीट होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये चौथीपर्यंत शिक्षण, त्यानंतर गावातील किंवा पंचक्रोशीतील पाचवी ते दहावी, बारावी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात पुढचे शिक्षण. त्यानंतर मग ज्यांना शक्य ते अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर पडायचे. काही जण कोल्हापुरातील महाविद्यालयात शिकायला यायचे, तर उरलेले जवळच्या दहा, बारा किलोमीटरच्या महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्यच्या पदवीसाठी अध्ययन करायचे.

परंतु, परिस्थिती बदलत गेली. इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व घरोघरी पोहोचले. पूर्वी मोजक्या इंग्रजी शाळा होत्या. परंतु, ही भाषा मुलांना आली तरच त्यांचे भवितव्य घडेल असे वातावरण तयार झाल्याने साहजिकच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे ओढा वाढू लागला. त्याही पुढे जात आता मुलांना इंग्रजी आले पाहिजे, स्पर्धा परीक्षेसाठी त्याची तयारी झाली पाहिजे, इतर कला आणि क्रीडा प्रकारांमध्येही तो अव्वल झाला पाहिजे यासाठी अकॅडमीचा पर्याय पुढे आला आणि तो आता बाळसेही धरू लागला आहे.

डीएड, बीएड. झाल्यानंतरही नोकरी न लागलेल्या अनेकांनी अशा अकॅडमी सुरू केल्या असून, त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. एकीकडे मोफत शिक्षण मिळत असून, तिकडे पाठ करून वर्षाला ५० हजारांपासून दीड लाखापर्यंत खर्च असणाऱ्या अकॅडमीमध्ये मात्र मुलांना प्रवेश मिळावा यासाठी पालक धडपड करताना दिसत आहेत.

काहींनी घेतली परवानगी

काही प्रथितयश अकॅडमींनी कायदेशीरदृष्ट्या शिक्षण खात्याची परवानगी घेऊन आपल्या अकॅडमी किंवा शाळा सुरू केल्या आहेत. परंतु, बहुतांशी अकॅडमींनी कुठेही नोंदणी न करताच आपला कार्यभार सुरू केला आहे. गावाबाहेर चार, पाच एकर जागा, इमारत, क्रीडांगण, बसेस घेऊन कामकाजही सुरू केले आहे.

आतापर्यंत ३२ शाळांची तपासणी

जिल्ह्यात अकॅडमींची संख्या भरमसाट पद्धतीने वाढत असल्याने आता माध्यमिक शाळांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांहून विद्यार्थी कोणत्याही सबळ कारणाशिवाय गैरहजर आहेत, अशा शाळांना नोटिसा काढण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ शाळांची तपासणी झाली आहे. शहरातील प्रतिभानगर येथील क्रांतिज्याेती हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना नोटीस काढण्यात आली आहे. या ठिकाणी बहुतांशी विद्यार्थी गैरहजर होते. तेव्हा त्र्यंबोली यात्रेमुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने गैरहजर असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या किंवा शासनमान्य शाळेत विद्यार्थ्याचे नाव आणि प्रत्यक्षात विद्यार्थी अकॅडमीमध्ये असे सर्रास चित्र जिल्ह्यात दिसत असून, याबाबत शिक्षण विभाग काहीही कारवाई करत नाही. खोटी हजेरी लावणाऱ्यांचीही चौकशी व्हावी. शिक्षण विभागाशी संबंधितांच्या किती अकॅडमी आहेत याचीही चौकशी होण्याची गरज आहे. - रूपेश पाटील, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड

Web Title: The increasing attraction of parents towards the academy has affected the schools of the Zilla Parishad and the secondary schools of educational institutions in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.