Mahadevi Elephant: आत्मक्लेश पदयात्रेमुळे हायवे, कोल्हापूर-सांगली मार्ग झाला होता ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:17 IST2025-08-04T19:16:38+5:302025-08-04T19:17:51+5:30
कोल्हापूर : नांदणी मठातील हत्ती परत मिळावा यासाठी नागरिकांनी काढलेल्या मूक पदयात्रेमुळे रत्नागिरी-नागपूर आणि पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ ...

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : नांदणी मठातील हत्ती परत मिळावा यासाठी नागरिकांनी काढलेल्या मूक पदयात्रेमुळे रत्नागिरी-नागपूर आणि पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जिल्हा पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे ४५० पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने आली. हजारोंच्या जनसमुदायामुळे वाहनधारकांना काही काळ महामार्गावर एकेरी वाहतूक करावी लागली. सांगली फाटा ते तावडे हॉटेल या परिसरात पदयात्रा येताच महामार्ग पोलिसांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर काही काळ एकेरी वाहतूक सुरू ठेवली. शहरातही पोलिसांनी एक मार्ग पदयात्रेसाठी रिकामा ठेवून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू ठेवली.
ताराराणी पुतळा चौक परिसर, ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद हॉल, स्टेशन रोडवर काही काळ वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली होती. दोन्ही महामार्गांसह शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा उपस्थित होता.
बंदोबस्त
- अपर पोलिस अधीक्षक - २
- पोलिस उपअधीक्षक - ३
- पोलिस निरीक्षक - ७
- सहायक पोलिस निरीक्षक - १५
- पोलिस उपनिरीक्षक -१५
- पोलिस अंमलदार - ३५०
- महामार्ग पोलिस - ५५