कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ‘आयाराम गयाराम’ची चलती, नेत्यांची बंद होणार बोलती
By भारत चव्हाण | Updated: July 9, 2025 17:40 IST2025-07-09T17:40:07+5:302025-07-09T17:40:37+5:30
उमेदवारी देताना राजकीय पक्षांना डोकेदुखी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ‘आयाराम गयाराम’ची चलती, नेत्यांची बंद होणार बोलती
भारत चव्हाण
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील तिन्ही पक्षांनी जिंकून येण्याची शक्यता असलेल्या संभाव्य इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार करण्यात आघाडी घेतली असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी देताना नेते मंडळींच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. मूळचे पक्षाचे कार्यकर्ते आणि आता बाहेरून निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना अनेक प्रभागात नेतेमंडळी कोंडीत सापडले जाण्याची जास्त शक्यता आहे.
कोणतीही निवडणूक असो सत्तेतील पक्षांचीच चलती असते. सत्ताधारी पक्षाकडे पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची संख्या मोठी असते. पक्ष कार्यात त्यांनी वाहून घेतलेले असते; परंतु निवडणुकीच्या राजकारणात त्यांचा टिकाव लागत नाही. अपवादानेच काही कार्यकर्ते निवडून येतात. त्यामुळे जिंकून येणारे उमेदवार अचानक पक्ष प्रवेश करून घेऊन त्यांना पायघड्या घातल्या जातात, हा नेहमीचा अनुभव आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनाही त्याची गरज असते.
यावेळच्या महापालिका निवडणुकीतदेखील हाच अनुभव येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना असे तीन पक्ष सध्या विरोधी बाकावर आहेत. त्यामुळे पुढील काळात विकासकामे करायची असतील, निधी मिळवायचा असेल तर सत्ताधारी पक्षात गेलेले बरे, असे म्हणत तिन्ही पक्षांचे माजी नगरसेवक शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करत आहेत; परंतु असे ‘इनकमिंग’ कधी फायद्याचे तर कधी तोट्याचे होऊ शकते.
लाभासाठी पक्ष प्रवेश करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेना, ताराराणी आघाडी आदी पक्षांचे २२ नगरसेवकांनी शिंदेसेनेत नुकताच पक्ष प्रवेश केला. अजूनही पंधरा ते वीस माजी नगरसेवक पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. परंतु उमेदवारी मिळेल या हेतूने आलेल्या या सर्वांचे समाधान करणे नेत्यांच्या नेतृत्वाचा कस सिद्ध करणारे ठरणार आहे.
- शहरातील सिद्धार्थनगर, पंचगंगा तालीम, खोलखंडोबा, शिपुगडे तालीम, अशा चार प्रभागांतील इच्छुकांची संख्या पाहता कोणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न पक्षांना पडणार आहे. या चारही प्रभागांत शिंदेसेना व भाजप यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. शिंदेसेनेकडे मातब्बर असे पाच तर भाजपकडे नऊ जण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
- फुलेवाडी रिंगरोड, फुलेवाडी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जिवबा नाना जाधवनगर प्रभागात उमेदवारांची भाऊगर्दी आहे. शिंदेसेना आणि भाजपकडेही इच्छुकांची संख्या जास्त आहे. उमेदवारी मिळेल या अपेक्षेने अनेकांनी पक्ष प्रवेशदेखील केला आहे.
- शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान, फिरंगाई, नाथागोळे तालीम आदी प्रभागात शिंदेसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याकडे उमेदवारीवरून घमासान होणार आहे. संभाव्य उमेदवारांची यादी पाहता खरी लढत शिवाजी पेठेतच होणार आहे. येथे भाजपला उमेदवार शोधावे लागतील.
- बाराईमाम, अकबर मोहल्ला, बिंदू चौक, शिवाजी चौक, कॉमर्स कॉलेज, कसबा बावडा परिसरात काँग्रेस पक्षाकडे उमेदवारांची संख्या जास्त आहे. राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, कदमवाडी परिसरात शिंदेसेना व भाजपकडे उमेदवार जास्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मोजक्याच प्रभागात इच्छुक दिसत आहेत.