मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 21:16 IST2025-11-09T21:15:36+5:302025-11-09T21:16:35+5:30
श्री अंबाबाई मंदिरात दक्षिणायन कालखंडातील पारंपरिक किरणोत्सव सोहळा रविवारपासून सुरू झाला. शनिवारी झालेल्या चाचणीत मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचली होती.

मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी किरणोत्सवाला प्रारंभ झाला. ढगांचा अडथळा नसल्यामुळे आणि निरभ्र आकाशामुळे मावळतीच्या सुवर्णकिरणे श्री अंबाबाईच्या मूर्तीच्या कानापर्यंत पोहोचली. सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुरु झालेला हा प्रवास ५ वाजून ४७ मिनिटांनी पूर्ण झाला. या सोहळ्याचे हजारो भाविक साक्षीदार ठरले.
श्री अंबाबाई मंदिरात दक्षिणायन कालखंडातील पारंपरिक किरणोत्सव सोहळा रविवारपासून सुरू झाला. शनिवारी झालेल्या चाचणीत मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचली होती. रविवारी पार पडलेल्या किरणोत्सवानंतर मंदिरात देवीची आरती होउन हा साेहळा पार पडला. हजारो भाविकांंसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, किरणोत्सव अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर यावेळी उपस्थित होते.
किरणोत्सवाचा प्रवाससायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी किरणे महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर ५ वाजून १४ मिनिटांनी गरुड मंडपामागे, ५ वाजून २३ मिनिटांनी गणपती मंदिरामागे, ५ वाजून २८ मिनिटांनी कासव चौक, ५ वाजून ३२ मिनिटांनी पितळी उंबरठा, ५ वाजून ३५ मिनिटांनी चांदीचा उंबरठा, ५ वाजून ३७ मिनिटांनी संगमरवरी पहिली पायरी, ५ वाजून ४० मिनिटांनी संगमरवरी तिसरी पायरी, ५ वाजून ४१ मिनिटांनी कटांजन असे टप्पे पूर्ण करत ५ वाजून ४२ मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. ५ वाजून ४५ मिनिटांनी किरणे मूर्तीच्या खांद्यापर्यंत आणि ५ वाजून ४७ मिनिटांनी मूर्तीच्या डाव्या कानापर्यंत पोहोचून लुप्त झाली.
गाभाऱ्यातील आर्दता ३५ च्या आत
स्वच्छ वातावरण आणि निरभ्र आकाशाची रविवारी किरणोत्सवाला चांगली साथ लाभली. गाभाऱ्यातील आर्दता ३५ च्या आत होती. पुढील दोन दिवसांत किरणे देवीच्या मुखकमलावर पोहाचण्यात कोणताही अडथळा नाही. आता १३ आणि १४ तारखेपर्यंत देवीच्या चेहऱ्यावर किरणे पोहोचून या सोहळ्याची सांगता होईल, असे प्रा. कारंजकर म्हणाले.
भाविकांची प्रचंड गर्दी
अंबाबाईच्या या किरणोत्सवाचे साक्षीदार बनण्यासाठी हजारो भाविकांनी रविवारी सायंकाळी मंदिराच्या आवारात गर्दी केली होती. दर्शन घेतल्यानंतरही अनेकजण थांबून राहिले होते. अनेकांनी मंदिराच्या आवारात लावलेल्या स्क्रीनवर या किरणोत्सवाचा आनंद घेतला.