महानाट्यातून उलगडला ताराराणींचा जाज्वल्य इतिहास, कोल्हापुरातील शाही दसरा महोत्सवांतर्गत आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:56 IST2025-09-25T12:55:40+5:302025-09-25T12:56:18+5:30
लाठीकाठी - मर्दानी खेळ, ताराराणी साहेबांनी स्वतः कारभार हाती घेऊन हाकलेला राज्य कारभार, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने केलेली कैद आदी नाट्यमय व रोमांचकारी घटनांतून उलगडला जाज्वल्य इतिहास

छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : पोवाडा, जिजाऊ वंदना, शिवाजी महाराजांचा जन्म, शिवकार्य आणि राज्याभिषेक, ताराराणी यांची जडण-घडण, लाठीकाठी - मर्दानी खेळ, ताराराणी साहेबांनी स्वतः कारभार हाती घेऊन हाकलेला राज्य कारभार, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने केलेली कैद आदी नाट्यमय व रोमांचकारी घटनांतून बुधवारी करवीर संस्थापिका भद्रकाली ताराराणी यांचा जाज्वल्य इतिहास उलगडला.
केंद्र शासनच्या सांस्कृतिक संचलनालय, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने दसरा चौकात आयोजित शाही दसरा महोत्सवांतर्गत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्याने मुगल बादशहा औरंगजेबाला अखेरपर्यंत कसे झुंजविले, याचे प्रभावी सादरीकरण केले. त्याला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीराजांना कैद करून औरंगजेबासमोर केले. यावेळी त्यांच्यामधील शाब्दिक जुगलबंदीने प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
श्वेता सुतार यांनी महाराणी ताराराणी यांची भूमिका नेटाने निभावली. नाटकाचे निर्माते चंद्रकांत पाटील व दिग्दर्शक ओंकार रोकडे यांचा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते गौरव झाला. तत्पूर्वी पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी कोल्हापूर गादीचा, तसेच येथील ऐतिहासिक वास्तूंचे, वैशिष्ट्यांचे स्लाइड शोद्वारे सादरीकरण केले.
यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, महावीर कॉलेजचे प्राचार्य अद्वैत जोशी, सीपीआरच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरिता थोरात, कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह नाट्यप्रेमी उपस्थित होते.
महोत्सवात आज
सकाळी ११ : १०० दिवसांत प्लास्टिकमुक्त कोल्हापूर या विषयावर पथनाट्य, छत्रपती शाहू मिल.
सायंकाळी ६ वाजता : आराधना भाग-१ सांस्कृतिक कार्यक्रम