कोल्हापूर जिल्ह्यात ४० लाख लोकसंख्येतून २३ हजार असाक्षर शोधण्याचे शिक्षण विभागासमोर 'टार्गेट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:51 IST2025-07-17T13:48:17+5:302025-07-17T13:51:36+5:30
असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षा

संग्रहित छाया
कोल्हापूर : देशातील एकही व्यक्ती असाक्षर राहता कामा नये, यासाठी केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. २०३० पर्यंत सर्व तरुण, प्रौढ स्त्री-पुरुषांना साक्षर बनविण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केली असून, कोल्हापूर जिल्ह्यात नवभारत साक्षरता अभियान जोरदारपणे राबवले जात आहे. त्याअंतर्गत येत्या वर्षात २३ हजार १२६ असाक्षर शोधून काढण्याचे टार्गेट शिक्षण योजना विभागाला दिले आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्याची ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असून यातील २३ हजार असाक्षर शोधण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. या नवसाक्षरांसाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाते. येत्या सप्टेंबरमध्ये ही परीक्षा होणार असून, यासाठी नोंदणी सुरू आहे.
निरंतर शिक्षणाकडून उच्च शिक्षणाकडे वाटचाल
या अभियानाचा उद्देश देश ९५ टक्के साक्षर करणे हा आहे. नव साक्षर लोकांना वाचणे, लिहिणे याच बरोबर गणित, बँकेचे व्यवहार येणे आवश्यक आहे. देशातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षा
सर्व्हेतून शोधलेल्या असाक्षरांची वर्षातून दोनवेळा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे त्यांच्यातील मूल्यमापन होते. लाभार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक यांचे सर्वेक्षण शाळांकडून केले जाते. ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये निरक्षर व्यक्ती नाहीत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शेजारचे निरक्षरांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. शासकीय/अनुदानित/खासगी शाळांमधील शिक्षकांव्यतिरिक्त शिक्षक पदाचे शिक्षण घेणारे, उच्च शिक्षण संस्थामधील विद्यार्थी, पंचायतराज संस्था, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांचाही स्वयंसेवक म्हणून सहभाग आहे.
केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून असाक्षरांचा सर्व्हे केला जात आहे. जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचा प्रयत्न आहे. - एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी योजना, कोल्हापूर