Kolhapur ZP Election 2026: मतमोजणी होणार जलद.. मोजणीसाठी जादा टेबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:39 IST2026-02-04T12:37:07+5:302026-02-04T12:39:17+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना : पाच टक्के मतदान जास्त होण्याची शक्यता

Kolhapur ZP Election 2026: मतमोजणी होणार जलद.. मोजणीसाठी जादा टेबल
कोल्हापूर : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मतमोजणीची प्रक्रिया जलद करण्यासाठी अतिरिक्त टेबलची व्यवस्था करा, पोस्टल मत मोजणीचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे आणि सर्व टपाली मतांची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय निकाल घोषित करू नये, अशी सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली. या निवडणुकीत गेल्यावेळच्या तुलनेत किमान ५ टक्के अधिक मतदान होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेसाठी येत्या शनिवारी ७ तारखेला मतदान तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होत आहे. त्याचीही तयारी निवडणूक प्रशासनाकडून जोरात सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी व उपविभागीय अधिकारी प्रत्यक्ष तर सर्व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
ते म्हणाले, मतदान केंद्रांवरील आवश्यक कामे ६ तारखेपर्यंतच पूर्ण करा. मतदानादिवशी गोंधळ होऊ नये यासाठी केंद्रांवर किमान २४ तास आधी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक तालुक्यात तीन याप्रमाणे जिल्ह्यात सर्वच ठिकाणी 'आदर्श मतदान केंद्रे' उभारा. सीसीटीव्हीचे मेगापिक्सल तपासून घ्या, वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी यूपीएस व जनरेटरची व्यवस्था ठेवा. निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी तंत्रस्नेही लोकांची मदत घ्या.