मारहाणीचे निमित्त: कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन गटांतील वाद पुन्हा उफाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:08 PM2023-12-12T12:08:13+5:302023-12-12T12:09:02+5:30

कोल्हापूर : खासगी सावकारी करणारे राजेंद्र ज्ञानदेव वरपे यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याच्या रागातून विरोधकांनी राज्य नियोजन मंडळाचे ...

The dispute between the two factions of Shiv Sena flared up again in Kolhapur | मारहाणीचे निमित्त: कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन गटांतील वाद पुन्हा उफाळला

मारहाणीचे निमित्त: कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन गटांतील वाद पुन्हा उफाळला

कोल्हापूर : खासगी सावकारी करणारे राजेंद्र ज्ञानदेव वरपे यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याच्या रागातून विरोधकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात बदमानीचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी केला. संबंधित वरपे यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.

दरम्यान, वरपे कुटुंबीयांना दमदाटी केल्याबद्दल क्षीरसागर यांचे पद मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवेदनाद्वारे दिला. वरपे मारहाण प्रकरणावरून शिवसेनेचा मुख्यमंत्री शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला.

माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि राजेंद्र वरपे यांच्यातील वादाला राजकीय स्वरूप आले आहे. शिवसेनेच्या शिंदे गट समर्थकांनी सोमवारी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना निवेदन देऊन वरपे यांच्यावर खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. ठाकरे गटाने राजेंद्र वरपे यांना पाठबळ देऊन क्षीरसागर यांच्याविरोधात भूमिका घेतली.

जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन क्षीरसागर यांच्यावर कारवाईची मागणी केली. क्षीरसागर आणि वरपे यांच्या वादाचे व्हिडीओ, शिवगंगा संकुलाच्या टेरेसवरील जेवणावळीचे फोटो याचे रिल्सही व्हायरल करण्यात आले. पोलिस अधीक्षकांना निवेदने देण्यासाठी दोन्हींकडून मोठ्या संख्येने जमाव जमल्याने वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले.

पोलिस निरीक्षकांना निलंबित करा : पवार

क्षीरसागर यांच्याविरोधात फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली. दहशत माजवणाऱ्या माजी लोकप्रतिनिधीच्या विरोधात न्यायालयातही दाद मागणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीप्रणीत बदनामी : चव्हाण

माजी आमदार क्षीरसागर यांच्यावर आरोप करणारे राजेंद्र वरपे यांच्यावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी क्षीरसागर यांनी पुढाकार घेतल्याच्या रागातून महाविकास आघाडीप्रणीत खासगी सावकार एकवटले आहेत. क्षीरसागर यांची बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली.

वरपे यांच्यावर खासगी सावकारीचा गुन्हा

क्षीरसागर यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरपे यांच्यावर कारवाई केली. त्याचा राग मनात धरून वरपे हा क्षीरसागर यांच्याशी वाद घालत आहे, अशी माहिती खासगी सावकारी प्रकरणातील तक्रारदार दीपक पिराळे, राहुल पिराळे आणि डॉ. शेजल पिराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केटरिंग व्यवसाय करणाऱ्या सीमा वसंत पाटील यांनीही शुक्रवारी (दि. ८) रात्री घडलेली हकीकत सांगून, वरपे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला. शिवगंगा संकुलातील रहिवासी प्रतिभा कांबळे, मृणाली वाकरेकर आणि अमृता बेलेकर यांनीही वरपे यांचे वर्तन विक्षिप्त असल्याचे सांगितले. क्षीरसागर यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The dispute between the two factions of Shiv Sena flared up again in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.