Kolhapur: बुजवडेजवळ थेट पाईपलाईनचा व्हाॅल्व्ह फुटला, लाखो लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:02 IST2024-12-20T14:00:51+5:302024-12-20T14:02:19+5:30
शेतकऱ्यांना नुकसान देण्यास टाळाटाळ

Kolhapur: बुजवडेजवळ थेट पाईपलाईनचा व्हाॅल्व्ह फुटला, लाखो लिटर पाणी वाया
सरवडे / कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाइपलाइन योजनेच्या बुजवडे (ता. राधानगरी) गावाजवळील शुक्रवारी एअर व्हाॅल्व्हला गळती लागून फुटला. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम सायंकाळनंतर हाती घेण्यात आले. या घटनेमुळे सायंकाळनंतर शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद झाला. आज, शनिवारी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.
काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला शुद्ध पाणी पुरवठा व्हावा म्हणून थेट पाइपलाइन योजना राबवली. मात्र योजनेच्या सुरुवातीपासूनच या पाइपलाइनला अनेक ठिकाणी गळती लागली. एकीकडे शेतकऱ्यांना शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नाही तर दुसरीकडे पाइपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. शुक्रवारच्या गळतीमुळे डाव्या कालव्यात शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे.
बुजवडे गावाजवळ शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता थेट पाइपलाइनवरील एअर व्हॉल्व्ह फुटला. त्यामुळे दिवसभर लाखो लीटर पाणी वाया गेले. तर काही शेतकऱ्यांची शेती तुटून कालव्यात गेले. पांडुरंग गुरव आणि बळवंत गुरव यांचे शेत तुटून कालव्यात गेले. कालव्यावर बसलेले इंजीनही पाण्याच्या प्रवाहामुळे पाणी आणि मातीच्या खाली झाकून गेले. सायंकाळपर्यंत या पाइपमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू होता. पाणी बंद केल्यावरही सुमारे नऊ किलोमीटर अंतरातील पाइपमधील पाणी वाहत होते.
शेतकऱ्यांना नुकसान देण्यास टाळाटाळ
आतापर्यंत तुरंबे, अर्जुनवाडा, तळाशी, शेळेवाडी, ठिकपूर्ली, हळदी अशा ठिकाणी पाइपलाइनला गळती लागली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अध्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. ठिकपूर्ली येथे लागलेल्या गळतीच्या कारणातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजेश माळी यांना अंघोळ घालत शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र गळतीची ही मालिकाच सुरू असल्याचे सध्या तरी दिसून येते.
सोमवारीही पाणी पुरवठा बंद
काळम्मावाडी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे तसेच बालिंगा सब स्टेशनच्या ३३ केव्ही मुख्य वीज वाहिनीचे देखभाल दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी या पंपांचा विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा होऊ शकणार नाही. संपूर्ण शहरातील ए,बी,सी,डी,ई वॉर्ड संलग्नित उपनगरे व ग्रामीण भागामध्ये सोमवारी पाणी पुरवठा बंद राहील. तसेच मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे महापालिकेने म्हटले आहे.
निकृष्ट काम कसे असते याचे उत्तम उदाहरण म्हणजेच थेट पाइपलाइन योजना आहे. या सर्व कामाची चौकशी व्हावी आणि निकृष्ट काम करणार यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. - विलास जाधव, भाजपाचे कोषाध्यक्ष
पाइप फुटली नसून व्हाॅल्व्हधून गळती लागली आहे. पाणी कमी येताच रात्रीत हॉल्व्ह दुरुस्त करुन शनिवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.- राजेंद्र माळी प्रकल्प व्यवस्थापक