आरोग्य सेवेत कोल्हापुरातील जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा डंका, देशातील पहिले 'मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर' कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:18 IST2026-04-01T19:17:33+5:302026-04-01T19:18:56+5:30
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला

आरोग्य सेवेत कोल्हापुरातील जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा डंका, देशातील पहिले 'मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर' कार्यान्वित
जयसिंगपूर : सरकारी दवाखाने म्हणजे केवळ उपचारांचे ठिकाण ही प्रतिमा पुसून काढत, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले 'देशातील पहिले मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर' उभारण्याचा मान या केंद्राला मिळाला असून, यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला आहे.
जिल्हा परिषदेचे हे आरोग्य केंद्र असून, या आरोग्य केंद्रावर एक लाख २० हजार लोकसंख्येचा भार आहे. गेल्या सात ते आठ वर्षात जयसिंगपूर आरोग्य केंद्राचा कायापालट वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांच्या माध्यमातून झाला आहे. स्वच्छ सर्वांग सुंदर दवाखाना या उपक्रमात सलग पाच वर्षे जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. त्याचबरोबर कायाकल्प योजनेतही सलग तीन वर्षे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच एनक्युएएस हे राज्यस्तरीय मानांकन जयसिंगपूर या एकमेव आरोग्य केंद्राने मिळविले आहे. त्यामुळे आता याची राष्ट्रीय मानांकनासाठी निवड झाली आहे.
डॉ. खटावकर यांच्या मागणीनंतर रोटरीचे बी. टी. नाईक, विनेश खाडे, आशुतोष पाटील, रोहित कुसनाळे यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इन्फोसिस कंपनीच्या सीएसआर फंडातून जयसिंगपूर आरोग्य केंद्रात मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे.
या मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन टेबल (रिमोटवरील), प्रसूती टेबल, भूलचे मशीन, बेबी वॉर्मर, शॅडोलेस लॅम्प, स्क्रबर मशीन, अत्याधुनिक लाईट, एसी, बाळाचे ठोके मोजण्याचे मशीन (फिटल मॉनिटर), रुग्णांचे अत्याधुनिक मॉनिटर मशीन, सक्षन मशीन अशा अत्याधुनिक पद्धतीचे थिएटर उभारण्यात आले आहे. त्यामुळे हे केंद्र राज्यात नव्हे तर देशात एकमेव ठरले आहे.
लोकसहभाग, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा दर्जा मिळाला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व प्रसूतिगृहामुळे निर्जंतुक वातावरण ठेवून यशस्वी शस्त्रक्रिया व प्रसूती होतील, याचा रुग्णांना लाभ घेता येईल. - डॉ. पांडुरंग खटावकर, तालुका आरोग्य अधिकारी, शिरोळ