कोल्हापूर गारठलं; तापमान घसरले १५ डिग्रीपर्यंत, कडाका वाढत जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:49 IST2025-11-11T18:47:46+5:302025-11-11T18:49:42+5:30
दोन दिवसांत वातावरणात झाला बदल

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, हळूहळू थंडी वाढत आहे. सोमवारी किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले असून, कमाल तापमानही २९ पर्यंत असल्याने गारठा जाणवू लागला आहे. आगामी आठ दिवस तापमानात आणखी घट होणार असून, थंडीचा कडाका वाढणार आहे. सततच्या पावसाने यंदा थंडीची चाहूल लागते की नाही ? असे वाटत असतानाच बोचऱ्या थंडीने सुरुवात केली आहे.
साधारणत: ऑक्टाेबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडीची चाहूल लागते. पण, यंदा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहिला. त्यामुळे थंडी येणार की नाही ? असेच वातावरण राहिले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस थांबला, पण थंडी नव्हती. जिल्ह्याचे किमान तापमान २२ ते कमाल ३१ डिग्रीपर्यंत राहिले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदलत होत आहे. पहाटेपासून धुके आणि थंड वारा वाहत आहे. सायंकाळी साडेसहानंतर हवेत गारठा सुरू होतो. रात्रभर थंड वारे वाहत असल्याने अंगातून गारठा जात नाही.
आगामी आठ दिवस जिल्ह्याचे किमान तापमान कमी होत जाणार आहे. शुक्रवारी (दि. १४) किमान तापमान १३ डिग्रीपर्यंत खाली येणार असल्याने अंग गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव येणार आहे.
नदी, पाणवठ्यावर अधिक कडाका
नदी, ओढ्यांसह पाणवठ्यावर थंडीचा अधिक कडाका जाणवतो. पाऊस उघडला असला तरी जमिनी अजून चांगलीच ओल आहे. त्यामुळेच, शिवारात थंडी अधिक जाणवते.
आगामी पाच दिवसांत असे राहणार तापमान, डिग्रीमध्ये ...
वार - किमान तापमान - कमाल तापमान
- मंगळवार - १५ - ३०
- बुधवार - १५ - २९
- गुरुवार - १४ - ३०
- शुक्रवार - १३ - २८
- शनिवार - १४ - २९
मागील पाच वर्षांत १० नोव्हेंबरला असे राहिले तापमान, डिग्रीमध्ये...
वर्ष - किमान तापमान - कमाल तापमान
- २०२१ - १९.४ - ३१
- २०२२ - १९ - ३२
- २०२३ - १५ - २९
- २०२४ - १४ - २८
- २०२५ - १५ - २९