मिरजकर तिकटीला घुमला वारकऱ्यांचा जयघोष, कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:45 IST2025-09-06T13:43:16+5:302025-09-06T13:45:05+5:30

पारंपरिक वाद्याची सुरावट तर कुठे टाळ-मृदुगाचा गजर, भगव्या पताका अन मुखी विठूनामाचा एकच जयघोष अशा भक्तीमय वातावरणात शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटीला गणेश विसर्जनाला सुरुवात झाली.

The cheers of the Warkaris echoed around the Mirajkar Tikti, the immersion procession began in Kolhapur. | मिरजकर तिकटीला घुमला वारकऱ्यांचा जयघोष, कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मिरजकर तिकटीला घुमला वारकऱ्यांचा जयघोष, कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

कोल्हापूर : कुठे साऊंड सिस्टीमचा दणदणाट, कुठे पारंपरिक वाद्याची सुरावट तर कुठे टाळ-मृदुगाचा गजर, भगव्या पताका अन मुखी विठूनामाचा एकच जयघोष अशा भक्तीमय वातावरणात शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटीला गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. शहरातील मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने याची सुरुवात होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या मंडळाची श्रीची आरती होऊन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषी वातावरणात सुरुवात झाली. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान या मंडळाच्या गणपतीला असतो. ढोल-ताशांचा अखंड गजर, झांथ पथकाने खासबाग मैदानाचा परिसर दुमदुमुन गेला. यावेळी खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या प्रशासक के.मंजुलक्ष्मी उपस्थित होते.

तुकाराम माळी मंडळाची श्रीची मिरवणूक मिरजकर तिकटीपासून पुढे सरकल्यानंतर शहरातील इतर मंडळांच्या बप्पांची मिरवणूक सुरु झाली. सकाळी अकरा वाजल्यापासून मिरजकर तिकटी ते बिनखांबी मार्गावर मंडळांची रीघ लागली. लेटेस्ट गणेश तरुण मंडळ व मंगळवारपेठेतील सनगर तालीम मंडळांच्या मिरवणुकीत वारकरी दिंडीने अवघे वातावरण पंढरीमय करुन टाकले. टाळ-मृदुंगाचा एकच गजर करत विठूमाऊलीचा जयघोष करण्यात आला. शाहुपुरीतील पाचबंगला तरुण मंडळाच्या मिरवणुकीत बालचिमुकल्यांनी वारकरी दिंडी काढली. दरम्यान, दुपारी पावने एकपर्यंत शहरातील बहुतांश गणेश तरुण मंडळांचे बप्पा मिरजकर तिकटीच्या मार्गावर येऊन थांबले होते. मिरजकर तिकटी-बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड-पापाची तिकटी गंगावेशमार्गे इराणी खण या मार्गावर विसर्जन मिरवणुका निघत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.

Web Title: The cheers of the Warkaris echoed around the Mirajkar Tikti, the immersion procession began in Kolhapur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.