कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचं कारण ‘विझलं’, तपासाची फाईल झाली बंद

By भारत चव्हाण | Updated: July 17, 2025 17:52 IST2025-07-17T17:52:12+5:302025-07-17T17:52:42+5:30

फॉरेन्सिक लॅब अहवाल संदिग्धच

The cause of the fire at Keshavrao Bhosale Theatre in Kolhapur was lightning, the investigation file has been closed | कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचं कारण ‘विझलं’, तपासाची फाईल झाली बंद

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचं कारण ‘विझलं’, तपासाची फाईल झाली बंद

भारत चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापूरच्या नाट्य चळवळीचा मूक साक्षीदार असलेल्या आणि याच चळवळीचा प्रदीर्घ असा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीसमोर मांडणाऱ्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून वर्ष उलटत आले तरी ही आग कशामुळे लागली, हे स्पष्ट झाले नाही. आगीचा तपास वेगवेगळ्या पातळीवर झाला, फॉरेन्सिक टीम आल्या, परंतु त्यांनाही आगीचा छडा लावता आला नाही. आगीचे कारण संदिग्ध राहिल्याने तपासाची फाईल आता बंद झाली आहे.

दि. ८ ऑगस्ट २०२४ च्या रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान, खासबाग मैदानातील मंच आणि त्याच्याजवळील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. आगीत नाट्यगृहाचा बराचसा लाकडी तसेच छताचा भाग जळून खाक झाला. रात्रीच्या वेळी निर्मनुष्य, तसेच बंदिस्त असलेल्या नाट्यगृहाला आग लागलीच कशी हा संपूर्ण शहरवासीयांना पडलेला प्रश्न होता. काही उलटसुलट चर्चादेखील शहरभर पसरल्या होत्या. परंतु नेमके कारण शोधण्यात कोणत्याच तपास यंत्रणेला यश आले नाही.

आग लागल्यानंतर दोन दिवसांत अग्निशमन अधिकाऱ्यांनी आग शॉर्टसर्किटने लागली नसल्याचा खुलासा केला. नाट्यगृहातील वायरिंग तसेच तेथील विद्युतगृहातील अनेक बॅटरीज, पाईप सुस्थितीत होत्या. महावितरणनेदेखील आग शॉर्ट सर्किटने लागली नसल्याचा खुलासा केला होता. त्यामुळेच संशयाची सुई ‘आग लावली गेली का ?’ या वाक्यावर चर्चेत राहिली.

महापालिकेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपास सूत्रे हाती घेतली. फॉरेन्सिक टीमदेखील येथे येऊन २८ नमुने घेतले. अग्निशमनने आधीच स्पष्टीकरण दिल्यामुळे पोलिसांवरील तपासाची जबाबदारी वाढली होती. फॉरेन्सिक तपासणीच्या अहवालातून काही बाबी समोर येतील अशी अपेक्षा होती. परंतु तोही अहवाल संदिग्ध आल्याने ‘आग कशामुळे लागली’ हा प्रश्नच गुंडाळला गेला आहे.

गवत कटिंग मशीनचा काय दोष ?

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात मैदानाकडील रंगमंचावर गवत कटिंग मशीन होते. मशीनमध्ये थोडे पेट्रोल होते असे नमूद आहे. परंतु मशीनच्या दणकट फायबरपासून बनविलेल्या टाकीतील पेट्रोल कसा पेट घेईल ? हा प्रश्न फॉरेन्सिक पथकाला पडला नाही.

वापरकर्त्यांची चौकशी झाली का ?

नाट्यगृहाच्या मागील रंगमंचावर काही पैलवान कुस्ती सराव करीत होते. तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणात मॅटिंग आणून ठेवले होते. मॅटमुळेच आग भडकली असा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला. मॅटची त्यांनी पुरेशी काळजी घेतली नाही हे सकृतदर्शनी स्पष्ट झाले. त्यामुळे त्यादृष्टीने तपास झाला का ? पोलिसांच्या गोपनीय विभागाने तपासाच्या कामात काही योगदान दिले का ? या गोष्टी समोर यायला पाहिजेत.

आगीचं प्रकरण विझलंच

अग्निशमन विभागाला तसेच पोलिस, फॉरेन्सिक विभाग यांना आगीचं कारण जर समजणार नसेल तर आगीचं कारण ‘विझलंच’ असे समजून तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. पण मूळ कारण गुलदस्त्यातच राहणार आहे.

नाट्यगृहाला लागलेल्या आगीचा फॉरेन्सिक अहवाल संदिग्ध आहे. नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे न्यायालयात आम्ही हा अहवाल तपास अहवालासोबत सादर करणार आहोत. - संजीव झाडे, पोलिस निरीक्षक

Web Title: The cause of the fire at Keshavrao Bhosale Theatre in Kolhapur was lightning, the investigation file has been closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.